लातूर : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्रावर बैठ्या पथकांचा वॉच राहणार आहे. तसेच संवेदनशील केंद्रावर विशेष पथक तैनात राहणार आहे.
बारावी परीक्षेसाठी लातूर जिल्ह्यातील ३५ हजार ५१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ९२ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे शाळा तेथे परीक्षा केंद्र होते. मात्र, यंदा सेंटरची संख्या कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना लिखाणाच्या सरावामुळे देण्यात आलेला वाढीव अर्धा तासही कमी करण्यात आला असून, तीन तासांचाच पेपर राहणार आहे. सोबतच १०० टक्के अभ्यासक्रम राहणार असून, केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करणाऱ्या सहायक परीरक्षकांना जीपीएस सुरु ठेवावे लागणार आहे. २१ मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षा चालणार असून, लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
बोर्डाकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर...मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मंडळस्तरावर दोन क्रमांकाची हेल्पलाईन सुरु केली आहे. तसेच बोर्डात सहसचिव एम.सी. फडके, सहायक सचिव ए.आर कुंभार यांच्याशीही संपर्क साधता येणार आहे. विद्यार्थी, शाळा प्रमुखांना आपल्या अडचणी विषयी संपर्क साधता यावा, यासाठी जे.एम. वारद, एम.एस. दानाई, ए.एम. जाधव, एम.एन. वांगस्कर, डी.डी. जाधव यांचे क्रमांक दिले आहेत.
लातूर मंडळात ९१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी...
बारावी परीक्षेसाठी ९२ केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रावर परीक्षेसाठी लागणारे साहित्य, बारकोड, स्टेशनरी, उत्तरपत्रिका केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन वितरीत करण्यात आले आहे. बारावी परीक्षेला विभागीय मंडळातून ९१ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये लातूर ३५५१०, उस्मानाबाद १६३५९ तर नांदेडच्या ३९७७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच लातूर ९२, नांदेड ९२ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ४० केंद्रावर परीक्षा होणार आहे.