अहमदपूर (जि. लातूर) : मराठवाड्यात गोदावरी नदीला अन्य लहान नद्या-उपनद्या जोडून वॉटर ग्रीड उभारू आणि कायमची दुष्काळमुक्ती करू, त्यासाठी २५ हजार कोटींचा प्रस्ताव तयार करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या १०३ व्या जन्मोत्सव सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही साडेचार वर्षांत केलेली कामे आणि विरोधकांच्या सत्ताकाळातील कामे याचा लेखाजोखा जनतेने पडताळावा. लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. मात्र दुष्काळावर मात करीत लातूरकरांनी शिक्षणानंतर जलसंधारणाचा पॅटर्न निर्माण केला आणि केंद्र सरकारचे जलसंवर्धनातील पहिले राष्ट्रीय पारितोषिक लातूरला मिळाले, याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख केला.
यावेळी खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, आ. प्रताप पाटील चिखलीकर, जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे आदींची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्र्यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मागण्या मांडल्या.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा १०३ वा जन्मोत्सव...राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा १०३ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. कमी व योग्य आहार आणि त्यावर नियंत्रण ठेवल्याने माणूस दीर्घायुषी होऊ शकतो, हा संदेश डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी दिला आहे. १९४५ साली लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळविणारे महाराज आज १०३ व्या वर्षीही लोकांसाठी समर्पित आयुष्य देत आहेत, असा गौरव या सोहळ्यात झाला.