लातूर: मनपाच्या न्यू काझी मोहल्ला येथील शाळा क्रमांक १३ व मंठाळे नगर येथील शाळा क्रमांक ९ मधील काही वर्गखोल्यांना गळती लागली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांच्या पावसामुळे छतावरून पाणी झिरपत आहे. वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, काही वर्गखोल्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
शाळा क्रमांक ९ आणि १४ ला गळतीन्यू काझी मोहल्ला येथे शाळा क्रमांक १३ असून, उर्दू माध्यमातील ही शाळा आहे. या शाळेतही गळतीमुळे गैरसोय होत आहे. याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. गोरगरीब, कष्टकरी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी छत गळती हे विघ्न आहे. शाळा क्रमांक १३ ला मोठी गळती आहे. त्यामुळे पावसात मुलं भिजतात. छताला अनेक ठिकाणी खपल्या, भेगा पडलेल्या आहेत.महानगरपालिकेच्या एकूण १६ शाळा आहेत. काही शाळांमध्ये सेमी इंग्रजी असल्यामुळे पट वाढतो आहे. परंतु, सुविधांचा अभाव आहे.
काही छतांना तडे अन् भेगाही...महानगरपालिकेच्या शहरात एकूण १६ शाळा आहेत. त्यापैकी मंठाळे नगर येथील शाळा क्रमांक ९ ही गुणवत्तेत चांगली आहे. या शाळेचा लौकिक आहे. परंतु, सध्या गळतीमुळे विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनावर राजा मणियार, डी. उमाकांत, जाकीर तांबोळी, बसवेश्वर रेकुळगे, फिरोज पठाण, इरफान शेख, उस्मान शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.