चाकूर : शेतीत सिंचनाची सुविधा व्हावी आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून शासनाच्यावतीने मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर खोदकाम करण्यात येते. मात्र, तालुक्यातील २८ गावांतील पाणीपातळी खालावल्याने या गावांतील शेतकऱ्यांना २५ वर्षांपासून मग्रारोहयोअंतर्गतच्या विहिरींचा लाभ मिळेनासा झाला आहे. परिणामी, शेती उत्पादन वाढेनासे झाले आहे. विशेष म्हणजे, या गावांत पूर्वी दरवर्षी जवळपास १४० पेक्षा जास्त विहिरी मिळू शकत हाेत्या. मात्र, सध्या त्यांचा लाभ मिळत नाहीत.
तालुक्यातील पाणी पातळीचा भूजल विकास आणि भूविकास यंत्रणेकडून सर्व्हे करण्यात आला होता. त्यात तालुक्यातील बनसावरगाव, भाटसांगवी, लातूर रोड, बोळेगाव, मोहनाळ, तिवघाळ, तिवटघाळ, अजनसोंडा (खु.), आटोळा, मोहदळ, बावलगाव, वडवळ (नागनाथ), हटकरवाडी, कबनसांगवी, कडमुळी, महाळंग्रा, महाळंग्रावाडी, नागेशवाडी, मुरंबी, उजळंब, नळेगाव, लिंबाळवाडी, शिवपूर अशा २८ गावांचा समावेश असून, येथील भूजल पातळी खालावली असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. जवळपास २५ वर्षांपासून या भागातील पाणीपातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत भूजल विकास यंत्रणेकडून पाणी पातळी वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले, हे गुलदस्त्यात आहे. अटल योजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही योजना राबविण्यात आली नाही.
शेतक-यांचे सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून शासनाच्यावतीने मग्रारोहयोतून गावातील लोकसंख्येच्या निकषानुसार शेतक-यांना सिंचन विहीर दिल्या जातात. परंतु, भूजल पातळी खालावली असल्याने या २८ गावांतील शेतकरी सिंचन विहिरीच्या योजनेपासून वंचित आहेत. सिंचन विहिरींचा लाभ या भागातील शेतक-यांना मिळत नाही.
भूजल पाणी पातळी वाढविण्यासाठी बनसावरगाव ग्रामपंचायतीसह अन्य ग्रामपंचायतींनी नाला सरळीकरण, नदीचे खोलीकरण, सीएनबी बंधारे, शोषखड्डे आदी कामे केली आहेत. त्यामुळे गावातील बंद पडलेले बोअर, हातपंपास पाणी येऊ लागले आहे. बोळेगाव (खु.) येथील साठवण तलावामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. दरम्यान, या भागातील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, भूविकास यंत्रणेकडून त्यासंदर्भातील अहवाल अद्याप मिळाला नसल्याने पाणीपातळीत वाढ झाल्याचे स्पष्ट होत नाही.
अहवाल मागविण्यात येईल...
तालुक्यातील २८ गावांतील पाणीपातळी खालावली असल्याचा अहवाल असल्याने त्या गावातील शेतक-यांना मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करता येत नाही. पाणी पातळीसंदर्भातील भूजल विभागाचा अहवाल मागवून घेऊन पाहणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.
खोलीकरण, शोषखड्डयांची कामे...
बनसावरगाव येथे नदीचे खोलीकरण, शोषखड्डे करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. तसेच अन्य काही ग्रामपंचायतींनी ही कामे केली आहेत. त्यामुळे या २८ गावांतील पाणीपातळीची पाहणी करण्यात यावी. भूजल पातळी वाढली असेल, तर सिंचन विहिरींना मंजुरी द्यावी.
- नीलेश भंडे, सरपंच, बनसावरगाव.
शेतक-यांची अडचण...
२५ वर्षांपासून २८ गावांतील शेतकरी मग्रारोहयोच्या सिंचन विहिरींपासून वंचित आहेत. या भागातील पाणी पातळीत निश्चित वाढ झाली आहे. प्रशासनाने सिंचन विहिरींसाठी घातलेली बंदी उठवावी आणि जास्तीत-जास्त विहिरी मंजूर कराव्यात.
- अब्दुल रहिम शेख, शेतकरी.