बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे. लातूर शहरामध्ये अद्याप आठ हजार बोअरचे पुनर्भरण झाले असून त्यापैकी पहिल्याच पावसामध्ये पाच हजार बोअरच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जलपुनर्भरण महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. या पुनर्भरण प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणाऱ्या शहरातील कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. ही मोहीम हॉटेल्स, कारखाने, शाळा-महाविद्यालयांसह अनेक कुटुंबीयांकडे राबविण्यात आली आहे. लातूर शहरातील भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना आपल्या भविष्यातील पिढीसाठी इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी एकत्रित करून व सांडपाणी अडवून ते जमिनीमध्ये मुरविण्यासाठी जलपुनर्भरणाच्या माध्यमातून बोअर पुनर्भरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम राबविणाऱ्यांना शहरात मालमत्ता करामध्ये पाच टक्के सूट देण्याचे जाहीर केले असल्याचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी जाहीर केले असल्यामुळे आजपर्यंत आठ हजार जणांनी जलपुनर्भरण व बोअर पुनर्भरणावर भर दिला आहे. लातूर शहरासह औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर नगरपालिकांनीही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत छतावरील पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविणे यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पुनर्भरणाच्या पारंपरिक उपाययोजना रुफ वॉटर फिल्टर, रिचार्ज पीट, सोक पीट, बोअर पुनर्भरण आदींवर भर दिला आहे. या मोहिमेत आठ हजार जणांनी बोअर पुनर्भरण केले आहे. जल पुनर्भरण करणाऱ्या तीन हजार नागरिकांना प्रमाणपत्र दिले आहे.
पुनर्भरणामुळे पाणीपातळीत वाढ
By admin | Published: July 25, 2016 12:25 AM