किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथे मागील दोन महिन्यांपासून निर्जळी असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
किल्लारी गावाला माकणी येथील धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत हाेता. मात्र, थकबाकीमुळे हा पुरवठा बंद करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून चिंचोली येथील तळे व जुन्या गावातील विहीरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, चिंचोली तळ्यातील पाणीसाठा संपला असून, जुन्या गावातील विहीरीचे पाणीही आटले आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाणीपुरवठा कसा करावा, यासाठी सरपंच युवराज गायकवाड व सदस्यांच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. मात्र, त्यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने जलस्त्राेतांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे गावातील तुरळक बोअरवेल सुरु असून, त्यावरुन पाणी आणण्यासाठी भरउन्हात ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाईमुळे ६०० रुपये देऊन विकतचे पाणी टँकर घ्यावे लागत असून, सर्वसामान्य नागरिकांना पैसे देऊन टँकर घेणे परवडणारे नसल्याने पाण्याच्या शोधात उन्हात फिरावे लागत आहे. बोअरच्या हौदावर तासनतास पाणी कधी येल याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने पाणी समस्येवर तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी होत आहे.
पाण्याचे नियोजन सुरु...माकणी धरणाचे पाणी थकबाकीमुळे बंद आहे. तर चिंचोली तळ्यातील पाणीसाठा संपला असून, जुन्या गावातील विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाणी कसे उपलब्ध होईल, यावर ग्रामपंचायकडून नियोजन करण्यात येत असल्याचे सरपंच युवराज गायकवाड यांनी सांगितले....