अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरात सतत पाऊस होत आहे. त्यामुळे मन्याड नदी दुथडी भरुन वाहत आहे. किनगावहून लातूरला ये-जा करण्यासाठी कारेपूरचा मार्ग सर्वात जवळचा आहे. दरम्यान, खानापूर गावाजवळील मन्याड नदी दुथडी भरून वाहत आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडचण येत आहे.
या पुलावरून सतत वाहतूक होत असते. सततच्या पावसामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या नदीवर जुना पूल असून, या पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे थोडासाही पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या पुलाची पाहणी नायब तहसीलदार बबिता आळंदे यांनी शुक्रवारी केली. यावेळी तलाठी हंसराज जाधव, मंडळाधिकारी सुनीता ताटीपामुलवार, सौदागर वैद्य, बाबूराव चाटे यांची उपस्थिती होती.
नागरिकांनी सतर्क राहावे...
नदीकिनारी असलेल्या गावांतील ग्रामस्थांना दवंडी देऊन सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पुलावरून प्रवास करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे नायब तहसीलदार
बबिता आळंदे यांनी सांगितले.