लातूर : सध्या उन्हाळा अन् टंचाईमुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांत पाण्याची समस्या आहे. पाणी साठविण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, साठवलेल्या पाण्यात डेंग्यू आजारास कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पाणीसाठे घट्ट झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे आवश्यक आहे.
१६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो. डेंग्यूचा प्रसार हा एडिस एजिप्त नावाच्या डासांमुळे होताे. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी ८ दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यात डासोत्पत्ती हाेते. ती कमी करण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. दरम्यान, जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने जनजागृती करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
साडेचार वर्षांमध्ये १५८ डेंग्यूचे रुग्ण...वर्ष - संशयितांचे रक्तजल नमुने - रुग्ण२०२० - १६ - ०२२०२१ - २१७ - ३९२०२२ - २३३ - २७२०२३ - ४६१ - ७५२०२४ एप्रिलअखेर - २१० - १५एकूण - ११३७ - १५८
डेंग्यू तापाच्या आजाराची लक्षणे...तीव्र स्वरूपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, जुलाब रक्तमिश्रित होणे (१५ वर्षांखालील मुलांना जास्त त्रास होतो)
प्रतिबंधात्मक उपाययोजना...आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावेत, डबकी व पाण्याच्या टाक्यांमध्ये डासअळी भक्षक गप्पीमासे सोडावेत. पाणी वाहते करा, डबके बुजवा, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, साठलेल्या डबक्यात, नाल्यात तेल वंगण टाकावे, रात्री विश्रांती घेताना अगरबत्ती, मच्छरदाणीचा वापर करावा, अंगभर कपडे घालावेत, आवश्यकतेनुसार घरात ॲबेटिंग, धूर फवारणी करुन घ्यावी.
रोग प्रसारक डासांची उत्पत्ती...डासाच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोष व प्रौढ डास अशा चार अवस्था असतात. तीन अवस्था ह्या पाण्यातील असतात. पाण्यातील अवस्था नष्ट केल्यास डासोत्पत्ती रोखणे शक्य होईल. अंडीपासून डास तयार होण्यासाठी साधारणत: ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. हौद, माठ, रांजण, रिकामे टायर्स, नारळाच्या करवंट्या, कूलरमधील ओव्हरहेड टँक, भंगार सामान, घर व परिसरात पाणीसाठ्यांत आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाणी साठल्यास डासोत्पत्ती होते.
लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत..ताप आल्यास तसेच डेंग्यू तापाची लक्षणे दिसताच तात्काळ रक्त तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निदान व उपचाराची साेय आहे. ताप अंगावर काढू नये.- डॉ. संतोष हिंडोळे, जिल्हा हिवताप अधिकारी.