लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवर नॅशनल हायवेमार्फत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील आर्वी जलकुंभाअंतर्गत असलेल्या सात वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या वस्त्यांतील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
लातूर मनपाच्या आर्वी जलकुंभाअंतर्गत आर्वी गायरान, हनुमान नगर, सोमवंशी नगर, डाळ मिल भाग, गडदे नगर, भगवानबाबा नगर, कौशल्यधाम आदी शहरालगतचा भाग आहे. या भागातील हजार ते बाराशे कुटुंबांचे नळकनेक्शन आर्वी जलकुंभाअंतर्गत पाईपलाईंवर आहे. मात्र लातूर-अंबाजोगाई रोडवर असलेल्या उड्डाण पुलाचे काम नॅशनल हायवेमार्फत चालू असल्याने मनपाला पुरवठा बंद कावा लागला आहे. पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. मनपाने या भागातील नागरिकांची सद्य:स्थितीत कसल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पर्यायी व्यवस्था न करताच काम सुरू... आर्वी गायरान, हनुमान नगर, सोमवंशी नगर, डाळ मिल भाग, गडदे नगर, भगवानबाबा नगर, कौशल्यधाम नगरात मनपाच्या नोंदीनुसार कमीत कमी हजार ते बाराशे नळकनेक्शन आहेत. या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मुबलक असताना या भागातील नागरिकांना आता टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उड्डाण पुलाचे काम कधी पूर्ण होणार, पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण कधी होणार, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सध्या तरी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठा किती दिवस बंद राहील, किती दिवस नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागेल, याबाबतचे कसलेही नियोजन मनपाच्या पाणीपुरवठा विभागात नाही. पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे जोपर्यंत काम सुरू आहे, पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काही तरी पर्यायी व्यवस्था पाणीपुरवठा विभागाकडून केली जाईल. तूर्त नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे. नॅशनल हायवेमार्फत उड्डाण पुलाचे काम चालू आहे. त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे कळविले आहे. - कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग मनपा