लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ९.५१ टक्के अति अल्प जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे लातूर महापालिकेने पाणी बचतीचा निर्णय घेतला असून, दर आठवड्याला तीन दिवस पाणीपुरवठा बंद, तर चार दिवस प्रकल्पातून पाणी उचलून शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे महिन्याला दीडऐवजी एक दलघमी पाणी लागणार आहे. अर्ध्या दलघमची बचत महिन्याला होणार आहे. नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सन २०११च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,७५४ इतकी असून, सध्याची एकंदर लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. १४५ लिटर दरडोई दररोज याप्रमाणानुसार शहरातील नागरिकांना ६७.५० दलली इतके पाणी लागते. २०% तूट आणि दहा टक्के इतर मागणी गृहीत धरले तर शहराला दैनंदिन ढोबळ पाणी मागणी ८९.१० दलली इतकी आहे. या गरजेनुसार महिन्याला अर्धा दलघमी पाणीबचत या उपायोजनेतून केली जात आहे. महिन्याला १.५ दलघमी पाणी उचलले जात होते. परंतु, सध्या एकदलघमी. पाणी उचलले जात आहे. तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून चार दिवस पाणीपुरवठा आठ दिवसाला होईल, या पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वितरणही केले जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिली.
शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणीपुरवठा राहतो बंद
मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे चार दिवस जलकुंभनिहाय पाण्याचे वितरण केले जात असून, त्याचे वेळापत्रक मनपाने प्रसिद्ध केलेले आहे.शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. मांजरा प्रकल्पातूनही पाणी उचलले जात नाही.बचतीचा हा उपाय गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.
बचतीचा उपक्रम दोन महिने राबविल्यास एक महिन्याची बचत
लातूर शहराला लागणारे पाणी आणि केलेली बचत याचे गणित केले तर एक महिन्याला लागणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. महिन्याला अर्धा दलघमी म्हणजे एक दलघमी पाण्याची बचत होईल. दोन महिने हा उपक्रम राबविल्यास एक दलघमी पाणी बचत होणार आहे.