औसा (जि. लातूर)- राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने आता त्वरित कारवाई करून तीन-चार दिवसात पंचनामे पूर्ण करावेत व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज औसा तालुक्यातील उजनी, अशिव, चिंचोली काजळे, शिवली मोड व बुधोडा येथील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आठ दिवसापूर्वी मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती खरडून गेली. तसेच सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या, ऊस, कापूस, मका व फळबागेचे देखील प्रचंड नुकसान झाले असल्याचेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणू. प्रसंगी मदतीसाठी संघर्ष करू असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कामासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. काहींना अजूनही त्याचा मावेजा मिळाला नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करू असे फडणवीस यांनी सांगितले.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी फळबाग शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मदत देण्याची मागणी केली होती. त्यावेळी मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो असे सांगून फडणवीस म्हणाले की आता हे दोघेही सत्तेत असून त्यांना मदत देण्याचा अधिकार आहे,याची आठवण आपण त्यांना दिली असल्याचेही त्यांनी बुधोडा येथील भाषणात सांगितले.
या दौऱ्यात फडणवीस यांच्यासोबत खा. सुधाकर श्रृंगारे, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष आ. रमेश अप्पा कराड, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. बब्रुवान खंदाडे, विनायकराव पाटील, शिवाजीराव पाटील कव्हेकर, गोविंद केंद्रे, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, युवानेते संतोष मुक्ता, जिल्हा अधिकारी जी श्रीकांत, औशाचे तहसीलदार शोभा पुजारी आदींचा समावेश होता.