अहमदपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, शहरातील चार वेल्डिंग उद्योजकांनी माणुसकी जपत अत्यवस्थ रुग्णांना असलेले ऑक्सिजन सिलेंडर गरजू हॉस्पिटलला उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे सदरील रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाल्याने प्रशासनाकडून त्यांचे कौतुक केेले जात आहे.
अहमदपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण रुग्णालयासह चार खाजगी रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यात ऑक्सिजनयुक्त खाटांची ४७ असून ऑक्सिजनविना खाटांची संख्या ७५ पेक्षा अधिक आहे. येथील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयास दररोज सरासरी ३० ऑक्सिजन सिलेंडर लागतात. मात्र, मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्यामुळे दररोज १७ सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाला धावपळ करावी लागत आहे.
लातुरातील दोन्ही एजन्सीकडे सिलेंडरचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच रात्रीच्यावेळी येथील एका खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर संपल्यामुळे तिथे असलेल्या १८ रुग्णांची अडचण झाली होती. ही बाब लक्षात येताच येथील मन्मथ प्रयाग, राम सोरडे, बालाजी चावरे व सिद्धी शुगरचे अविनाश जाधव आदींनी रुग्णालयाला मदतीचा हात देऊन त्यांच्या उद्योगासाठी आणलेले सर्व सिलेंडर संबंधित हॉस्पिटलकडे उपलब्ध करुन दिले.
मन्मथ प्रयाग यांनी १२, शुभम सोरडे यांनी ११, सिद्धी शुगरने ७ आणि बालाजी चावरे ४ ऑक्सिजन सिलेंडर प्रशासनाकडे दिले आहेत. त्यातील भरलेले सिलेंडर हॉस्पिटलमध्ये देण्यात येऊन रिकामी सिलेंडर रिफिलसाठी पाठवून देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या तरी अहमदपूरला दोन दिवस पुरेल एवढा साठा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पाटील, पोलीस नाईक रमेश आलापुरे, सुहास बेंबडे, मन्मथ प्रयाग, राम सोरडे, बालाजी चावरे आदी उपस्थित होते.
इतरांनीही आदर्श घ्यावा...
तालुक्यात अनेक वेल्डिंग उद्योग असून त्यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असल्याची माहिती येत आहे. त्यामुळे ज्या उद्योगाकडे ऑक्सिजन सिलेंडर आहेत. त्यांनी व कटिंगसाठी प्लाजमा पद्धत वापरून ऑक्सिजन सिलेंडर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
उद्योजकांचे कौतुक...
हॉस्पिटलसाठी दररोज ३० सिलेंडर लागतात. त्यात केवळ १७ सिलेंडरचा पुरवठा होत होता. मात्र वेल्डिंग उद्योगाच्या वतीने शहरातील सर्वच हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध केल्यामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचल्याचे डॉ. ऋषिकेश पाटील यांनी सांगितले.