विनायक चाकुरे
उदगीर : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्वच भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मध्यंतरी काही दिवस खंड पडल्यानंतर जुलै महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकाची परिस्थिती सुधारली आहे. त्यातच बुधवारी तालुक्यात सर्वत्र दिवसभर भिज पाऊस होता. हा पाऊस काही भागात पिकाला पोषक आहे तर काही भागातील शेतात पाणी साचण्याची शक्यता शेतकऱ्याकडून वर्तवली जात आहे. सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने फवारणी करणे गरजेचे बनले आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची पिके सावरली आहेत. विशेषत: सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तालुक्यातील काही मंडळ जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी,नाल्याला पूर आला होता. त्यातच बुधवारी दिवसभर उदगीर शहर व तालुक्यात सर्वच भागात दिवसभर भिज पाऊस होता. तालुक्यातील अनेक भागातील सोयाबीनवर शेतकरी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणीच्या कामाला लागले आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपाची सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकाची वाढ चांगली होत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसून सोयाबीन मोठ्या प्रमाणात डागी होऊन त्यामुळे योग्य दर मिळाला नव्हता. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट व तेलाला असलेली मागणी त्यामुळे यावर्षी सोयाबीनला मागील काही दिवसांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा यंदा सोयाबीनवर अवलंबून आहेत.
उदगीर मंडळात सर्वाधिक पाऊस..
उदगीर ५३६ मि.मी. नागलगाव ४२१, मोघा ४३४, हेर ३६३, वाढवणा ५०६, नळगीर ५८९, देवर्जन ३६८ तर तोंडार महसूल मंडळात ३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे मशागतीच्या कामांना अडचण...
किनी यलादेवी भागात चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची परिस्थिती उत्तम असून, मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत मशागतीच्या कामाला अडचण निर्माण झाली आहे. या भागातील तळे, विहिरी भरल्या असून, मागील काही वर्षापासून आषाढी एकादशीपूर्वी तळे व विहिरी भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. -ज्ञानेश्वर नारगुडे, शेतकरी, किनी यलादेवी.