लातूर: नीट गुणवाढ प्रकरणात लातुरात गुन्हा दाखल झालेले आराेपी केवळ नीटच नव्हे तर इतर निवड मंडळ परीक्षांसाठीही काम करत हाेते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आराेपींच्या माेबाइल गॅलरीत नीटच्या प्रवेशपत्राबराेबरच इतर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आढळून आल्याचे मंगळवारी सूत्रांनी सांगितले.
दिल्लीचा आराेपी गंगाधर, मध्यस्थ इरण्णा आणि प्रवेशपत्र घेऊन समन्वय करणारे पठाण आणि जाधव साेबतीला त्यांच्या आणखी दाेघे असा सगळा उलगडा झाला आहे. त्यातच आराेपींकडे इतर नाेकरभरती संदर्भातील उमेदवारांची काही प्रवेशपत्र तपास पथकाला आढळून आल्याचे समजते. जिल्हा परिषद शिक्षक, आयटीआयतील कर्मचारी यांच्याकडे नीटच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे येण्याचे कारणच काय? यावरून पाेलिसांची तपासचक्रे फिरली.
काेणाला लाभ झाला, काेणाचे पैसे परत...
गुणवाढीसाठी ज्यांचे पैसे घेतले त्यातील काेणाकाेणाला लाभ झाला, खरेच गुण वाढले का, आराेपींना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे काेठून मिळाली आणि ज्यांचे काम झाले नाही, त्यांना पैसे परत मिळाले का, हे सर्व तपासानंतरच समाेर येईल. तूर्त जे गुणवाढीच्या आमिषाला बळी पडले व ज्यांचा संदर्भ पाेलिसांसमाेर आला, त्यांना आता चाैकशीचा फेरा अटळ आहे. मंगळवारी ज्या पाच-सहा जणांची चाैकशी झाली त्या सर्वांनी काय खुलासे केले, यातून पुढची दिशा स्पष्ट हाेईल.
लातूरचे पाेलिस पथक धडकले झारखंडमध्ये...
नीट प्रकरणाचा तपास करण्यासाठी लातूर येथील पाेलिस पथक हैदराबाद मार्गे विमानाने झारखंड राज्यात पाेहचले आहे. महाराष्ट्रातील लातूर आणि झारखंड येथील नीट प्रकरणाचा काही संबंध आहे का? याचे धागेदाेर शाेधण्यासाठी, प्रकरणाचा तपास पथक करणार आहे. शिवाय, दिल्लीतील आराेपी गंगाधरच्या मागावरही हे पथक असल्याचे सांगण्यात आले.