औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील बसस्थानकात मुक्कामी थांबलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्याने पळवून नेली. चोरीस गेलेली ही बस शेजारील कर्नाटकातील केसरजवळगा गावाजवळ लातूर- जहिराबाद महामार्गालगत आढळून आली. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा आगाराची निलंगा- औराद शहाजानी (एमएच २०, बीएल २०७९) ही बस बुधवारी रात्री चालक बालाजी काेकणे यांनी औराद शहाजानी येथील बसस्थानकात उभी करुन विश्रामगृहात ते आराम करीत हाेते. दरम्यान, गुरुवारी पहाटे ३ ते ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही बस चालू करून मुख्य बाजारपेठेतून महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरून कर्नाटक राज्यातील केसर जवळगा या गावाजवळील लातूर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सोडून दिल्याचे आढळले. याप्रकरणी बालाजी काेकणे यांच्या फिर्यादीवरुन औराद शहाजानी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपाेनि. पंकज शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस जमादार माेरे हे करीत आहेत.
दुसऱ्यांदा बस पळविली...औराद शहाजानी येथील बसस्थानकातून सन २०२१ मध्ये एका तळीरामाने गावाकडे जाण्यासाठी वाहन मिळत नाही म्हणून बस स्थानकातून पळविली हाेती. येथील बसस्थानकाला संरक्षण भिंत नाही. परिसरात माेकाट जनावरे व वराहांचा वावर वाढला आहे. तसेच पुरेशी विद्युत व्यवस्था नाही. पिण्याचे पाणी नाही. प्रवाशांना बसण्याची आसन व्यवस्था नाही. हे बसस्थानक पडण्याचा स्थितीत आहे. त्याचा अहवाल सादर हाेऊनही अद्याप काम सुरू करण्यात आले नाही.