लातूर : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अनुदानावर मिरची कांडप यंत्र, मिनी पिठाची गिरणी, मुलींसाठी सायकल देण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ३ कोटी ७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या साहित्याच्या लाभासाठी नजीकच्या पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांच्या प्रगतीसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून मागास प्रवर्गासाठी आठ तर दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीतून चार योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी ३ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातून १ हजार २३५ लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत अनुदानावर मिरची कांडप यंत्र, पिठाची गिरणी, पिकोफॉल मशीन, मुलीला सायकल, शेतकरी कुटुंबासाठी ५ एचपीचा पाणबुडी पंप आदी साहित्य देण्यात येणार आहे. त्यासाठी मागासप्रवर्गातील व्यक्तींनी १५ डिसेंबरपर्यंत नजीकच्या पंचायत समितीकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.
मागासवर्गीयांसाठीच्या योजनेचे नाव - निवडावयाची संख्या - तरतूदमहिलांना मिरची कांडप यंत्र - १०० - २५ लाखमुलींना सायकल - २५० - १० लाखमहिलांना मिनी पिठाची गिरणी - १२९ - २० लाखमहिलांना पिकोफॉल यंत्र - २०५ - १५ लाखशेळीपालन - १६६ - ७० लाख५ एचपी पानबुडी पंप - ९० - १९ लाख ५० हजारबँड वाजंत्री साहित्य (सामूहिक) - १२ - १५ लाखबचत गटांना अर्थसहाय्य (सामूहिक) - १०० - ३० लाखदिव्यांग गटांना अनुदान (सामूहिक) - ११ - ३३ लाखदिव्यांगांना घरकूल - ३७ - ४५ लाखशेळीपालनासाठी अर्थसहाय्य - ३५ - १५ लाखअतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना अर्थसहाय्य - १०० - १० लाख
३ कोटींचा निधी उपलब्ध...जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून समाजकल्याण विभागांतर्गत मागास प्रवर्गातील कुटुंबांसाठी ८ तर दिव्यांगांसाठी चार योजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत एकूण १ हजार २३५ लाभार्थींची निवड केली जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी ७ लाख ५० हजारांचा निधी उपलब्ध आहे. त्याचा ग्रामीण भागातील गरजूंना लाभ मिळणार आहे.- अनमोल सागर, सीईओ, जिल्हा परिषद.
१५ डिसेंबरपर्यंत मुदत...या योजनेची संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेच्या www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर तसेच पंचायत समितीत उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून १५ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.