लातूर : शहरातील सारोळा रोड परिसरात धारधार कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलीस पथकाने बुधवारी सकाळी पकडले. त्याच्याकडून लोखंडी धारदार कोयता जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूरतील माताजी नगरात राहणारा तरुण विवेकानंद चौक परिसरात असलेल्या सारोळा रोड येथील कुष्ठधाम लगतच्या भागात कोणा सोबततरी भांडण, तंटा आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हातात लोखंडी कत्ती (कोयता) घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. या माहितीची पडताळणी, खातरजमा करून विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून एका युवकाला पकडले. चैकशी केली असता, योगेश उर्फ शक्ती अशोक गुरने (वय २३, रा. माताजी नगर, लातूर) असे त्याने नाव सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी कोयता जप्त केला आहे.
याबाबत पोलीस शिपाई अशोक अनिरुद्ध नलवाड (वय ३५ रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दुड्डे करत आहेत.
दोन दिवसातील ही दुसरी घटना...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसानी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. दोन दिवसापूर्वी रहीम नगरात राहणाऱ्या अरमान नजीर शेख (वय १९) या तरुणांकडून एक तलवार जप्त केली होती. दरम्यान, आज बुधवारी माताजी नगरात राहणाऱ्या तरुणाकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी दिली.