राजकुमार जाेंधळे
लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून पालक - विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने दाेघा शिक्षकासह म्हाेरक्या एन. गंगाधरला अटक केली. सध्या त्यांचा मुक्काम न्यायालयीन काेठडीत आहे, तर इरण्णा काेनगलवार हा एटीएस, पाेलिस आणि सीबीआयलाही गुंगारा देत पसार आहे. त्याच्या अटकेसाठी तपास यंत्रणा मागावर असून, नीट प्रकरणाची चाैकशी आता इरण्णावर येऊन ठेपली आहे. त्याच्या चाैकशीत अनेक धागे गुंतल्याचा संशय सीबीआयला असून, ताे गुंता साेडविण्यासाठी ताबा हवा आहे.
‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून फसविण्यात आलेल्या विद्यार्थी - पालकांची यादी ८०वर पाेहचली असून, सीबीआयकडून चाैकशी केली जात आहे. जबाबही नाेंदवले जात आहेत. यातील १८ विद्यार्थी - पालकांची स्थानिक पाेलिसांनी प्रारंभीच चाैकशी केली. आता हा आकडा वाढत असल्याने प्रकरणाचा गुंता वाढत आहे. सीबीआयच्या चाैकशीचा पालकांनी धसका घेतला आहे. यात लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी असल्याचे समाेर आले आहे.
लातुरातील गुन्ह्याचा तपास दिल्लीच्या ‘गाइडलाइन’वर...
‘नीट’प्रकरणी लातुरात दाखल गुन्ह्यात सीबीआयने आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. दरम्यान, दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास केला जात असून, लातुरातील नीटप्रकरणाचा तपास दिल्लीच्या ‘गाइडलाइन’वर सुरू आहे. काही कागदपत्रेही दिल्लीतून पाठविण्यात येत आहेत. लातुरातील तपास अधिकाऱ्यांना दिवसातून दाेनदा वरिष्ठांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
‘त्या’ आर्थिक व्यवहाराची सीबीआयकडून पडताळणी..
गुणवाढीचे आमिष दाखवून अनेक पालकांकडून लाखाे रुपये उकळल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले असून, याच पुराव्यांच्या आधारे दाेघा शिक्षकांसह आंध्र प्रदेशातील एन. गंगाधरला अटक केली आहे. आता या व्यवहाराच्या आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. प्राथमिक चाैकशीत सात लाखांचा व्यवहार झाल्याचे रेकाॅर्डवर आले आहे.
इरण्णाच्या वकिलाने मांडली जामिनावर बाजू...
लातूर जिल्हा विशेष न्यायालयात वकील ए. पी. ताेतला यांच्या मार्फत इरण्णा काेनगलवार याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. १५ जुलै राेजी सुनावणी हाेती. मात्र, सीबीआयने स्वत: न्यायालयात हजर हाेत चाैकशीसाठी इरण्णाचा ताबा द्यावा, अशी विनंती केली. यावर १८ जुलै राेजी सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले हाेते.
न्यायालय म्हणाले, एक दिवसाचा वेळ
न्यायालयासमाेर सीबीआयने गुरुवारी आपली बाजू मांडली. महत्त्वाची कागदपत्रे आज हाती पडली आहेत. अभ्यासासाठी वेळ द्यावा, अशी विनंती सीबीआयचे वकील मंगेश महिंद्रकर यांनी केली. यासाठी लातूर जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक - २ न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी एक दिवसाचा वेळ दिला आहे. दरम्यान, यावर शुक्रवारी सुनावणी हाेत आहे.