चाकूर (जि. लातूर) : सैन्य भरतीला जातो म्हणून चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने पाच-सहा दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. गेल्या सहा महिन्यात तो तीन-चार वेळा दिल्लीला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. मोलमजुरी आणि मंदिरात झाडलोट करून उपजीविका करणाऱ्या अमोलच्या आई-वडिलांना त्याचे दिल्लीला जाण्याचे कारण माहिती नाही. मात्र, तो सैन्य भरतीसाठी जात असे. दरम्यान, एटीएससह स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलिसांचे पथक चौकशीसाठी झरी बु. गावात दाखल झाले आहेत.
दिल्ली येथील संसद भवनात हिवाळी अधिवेशन सुरू असताना सुरक्षा कवच तोडून प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारलेल्या दोघांपैकी एक अमोल धनराज शिंदे आहे. तो चाकूर तालुक्यातील झरी बु. गावचा रहिवासी आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अमोलच्या पार्श्वभूमी संदर्भात झरी बु. गावांत तपास यंत्रणेचे वेगवेगळे पथक दाखल झाले आहेत. मात्र, याबाबतची माहिती गावकऱ्यांना नव्हती. अमोल शिंदे याचे आई-वडील मोलमजुरी आणि मंदिरात झाडलोट करतात. त्याचा मोठा भाऊ मुंबई येथे मिस्तरी काम करतो आणि दुसरा भाऊ लातूरमध्ये मोलमजुरीला जातो. तर एक बहीण विवाहित आहे. अमोलही गावात असल्यानंतर मोलमजुरीला जात असल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले आहे. वेगवेगळ्या खेळात त्याला रस असल्याने पोलिस व सैन्य भरतीची तो तयारी करीत होता. जिथे भरती आहे तिथे तो जात होता, असे गावातील काही नागरिकांनी सांगितले.
दिल्लीत सैनिक भरती आहे सांगून गेलाआई-वडील म्हणाले, दोन दिवसांपासून माेबाइल बंद...नोकरी लागत नसल्यामुळे अमोल नैराश्यात होता. ९ डिसेंबरला रात्री ७ वाजता तो दिल्लीला जातो म्हणून गेला. गावातही तो दररोज कामाला जात होता. तिकडे काय झाले माहीत नाही. गेल्या दोन महिन्यात तो दिल्लीला गेला होता. दिल्लीत भरती आहे, आता कागद मिळणार आहे, असे तो सांगत होता. १० तारखेपासून तर त्याचा मोबाइलच लागला नाही. ९ तारखेला दिल्लीला जाताना डबा करून दिला. त्याने तिकडे काय केले, आम्हाला माहिती नाही, असे अमाेलचे वडील धनराज, आई केशरबाई यांनी सांगितले.
त्याचे ऐकून तरी घ्या अमोल सरकारी नोकरीसाठी धडपड करत होता. काय गुन्हा केला, त्याची काय इच्छा आहे ते तर जाणून घ्या. त्याला मध्ये कसे जाऊ दिले. त्याला नोकरीची अपेक्षा होती. काय झाले हे,पण त्याचे म्हणणे तरी ऐकून घ्या. असा अशी आर्जव अमोलच्या आईने केले. तर पोलिस आले त्यांनी चौकशी केली. घराची झडती घेतली. पण आम्हाला काहीच माहिती नाही. तो पोलिस भरतीसाठी गेला एवढच. पोलिस आले तेव्हा पोरग जीवंत आहे की मेल एवढेच सांगा म्हंटले. तो आता सुखरूप घरी यावा, आणखी काय बोलावे अशी अपेक्षा अमोलच्या वडिलांनी व्यक्त केली.
तपास यंत्रणांचा झरी बु. गावात तळ...दहशतवाद विरोधी, आरसीपी, नांदेड येथील एटीएस तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, आयबी आदी तपास यंत्रणांचे पथक झरी बु. गावांत दाखल झाले आहे. या पथकाने अमोलच्या आई-वडिलांसह नातेवाइकांकडे विचारपूस सुरू केली आहे. झरी बु. गावात सध्या पोलिस यंत्रणांचा तळ आहे. अमोलबाबत विचारणा केल्यानंतर भीतीपोटी कोणीही काही माहीत नसल्याचे सांगत आहेत. पाच-सात दिवसांपूर्वी तो गावात अनेकांना भेटला असला तरी माहिती नसल्याचेच गावातील लोक सांगत आहेत.