लातूर : दोन पंतप्रधानांची भूमिका घेणाऱ्या महाआघाडीसोबत शरदराव तुम्हीसुद्घा कसे काय आहात? असा सवाल उपस्थित करीत उपरोधिक भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिकास्त्र सोडले.
लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सकाळी औसा येथे जाहीर सभा झाली. मोदींनी आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात दहशतवाद, पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपा सरकारच्या योजनांवर विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, राजकारण ठिक आहे. परंतु शरद पवार हे सुद्घा अशा लोकांसोबत आहेत, त्यांना हे शोभून दिसत नाही. पाकिस्तानचे विमान पाडले की, पाडले नाही यावर सैन्यांनी किती पुरावे द्यायचे. तुम्हाला तुमच्या वीर जवानांवर विश्वास नाही. याउलट देशाला शिव्या देणारे, देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांना खुला परवाना देण्याचे धोरण काँग्रेसचे आहे. जे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करुन स्पष्ट केले आहे. राष्ट्रवाद आमची प्रेरणा आहे आणि सुशासन हा आमचा मंत्र आहे. मात्र विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. आमचे धोरण दहशतवाद्यांच्या भूमित घुसून मारण्याचे आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
महायुतीचे देशहितासाठी काम विकासयोजनांचा पाढा वाचताना मोदी म्हणाले, महायुतीने देशहितासाठी काम केले आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. प्रत्येकाला पक्के घर दिले जाईल. शेतकरी सन्मान योजनेत आता सर्वच शेतकऱ्यांचा समावेश केला जाईल. शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करु, ४० कोटी असंघटित कामगारांना तीन हजार नियमित पेन्शन देऊ. आम्ही आतापर्यंत आर्थिकदृष्ट्या मागासांना दहा टक्के आरक्षण दिले. गाव तिथे वीज नेली. गॅस पोहचविला. शौचालय उभारले. सर्वांचे बँक खाते काढले. आम्ही लवकरच जलशक्ती हे स्वतंत्र मंत्रालय स्थापित करु असेही ते म्हणाले.