लातूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आ. पंकजा मुंडे यांची लातूर तालुक्यातील महापूर येथे रस्त्यात अचानक भेट झाली. १५ मिनिटे उभय नेत्यांनी रस्त्यात थांबून चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात ‘ओबीसी आरक्षण बचाव यात्रा’ सुरू केली आहे. सध्याच्या परिस्थितीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणी करत आहेत. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी चुकीची असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर आणि मुंडे भेटीची मोठी चर्चा आहे.
प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षण बचाव यात्रेसाठी बीड जिल्ह्यात जात होते तर पंकजा मुंडे या लातूर येथे आयोजित पक्षाच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येत होत्या. मंगळवारी सकाळी आरक्षण बचाव यात्रा बीड जिल्ह्याकडे रवाना झाली. ११ वाजता महापूर येथे या दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली. यावेळी आ. पंकजा मुंडे यांनी आंबेडकर यांचे स्वागत केले व त्यांच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान कौटुंबिक चर्चा झाल्याचे पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, अविनाश भोसीकर उपस्थित होते.
तेच काम आम्ही पुढे नेत आहोतराजकारणामध्ये वंचितांना, ज्यांचा आवाज कोणीच ऐकू शकत नाही,. त्यांना शक्ती देण्यासाठी गोपीनाथ मुंडेसाहेब राजकारणात आले होते. मुंडेसाहेबांनी अशा लोकांना, समाजाला संधी दिली ते काम आम्ही पुढे करत राहू, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.