लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शाळेत शिक्षकांनी शैक्षणिक कामे करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सांभाळला पाहिजे, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र शिक्षणाव्यतिरिक्त ३० ते ३५ प्रकारची कामे शिक्षकांना करावी लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे, सर्वेक्षण ही काय शिक्षकांची कामे आहेत का? असा सवाल शिक्षक संघटनांतून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बाराशेहून अधिक शाळा आहेत. तर यामध्ये पाच हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. तर तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शाळांमध्ये आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना विविध प्रकारची कामे करावी लागत आहेत. आपत्कालीन कामे, प्रत्यक्ष जनगणना, निवडणुकीशिवाय इतर अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका व्हावी, अशी मागणी शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
एक शिक्षकी शाळेचे हाल
एका शिक्षकावर अवलंबून असलेल्या शाळांमध्ये शिकविण्यासह सर्व कामे एकाच शिक्षकाला करावी लागतात. दोन शिक्षकी शाळेत एक शिक्षक शाळाबाह्य कामांसाठी गुंतलेला असल्याने त्याही शाळा एक शिक्षकच बनल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे चित्र आहे.
शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक
खिचडी शिजविणे, जनगणना, बांधकाम, डागडुजी, रंगकाम, आरोग्य विभागाचा सर्वे, झाडे, स्वच्छतागृहाचे आकडे गोळा करणे आदी कामे करावी लागतात.
निवडणुकीचे काम, कोरोना प्रतिबंधात्मक कामांची जबाबदारीही दिली जाते.
शिक्षकांना केवळ अध्यापनाचेच कार्य करण्यास वेळ देण्याची मागणी होत आहे.
शिक्षकांची कामे
खिचडी शिजवून वाटप करणे
आधार कार्ड तयार करणे
शाळांची डागडुजी, रंगकाम करणे
आरोग्य विषयक विविध सर्वेक्षण
मतदार याद्या, ओळखपत्र पुनरिक्षण
शिक्षक संघटना काय म्हणतात?
शिक्षकांकडे असलेली अशैक्षणिक कामे काढून घेतली तरच चांगल्या प्रकारे ज्ञानदान करता येईल. दर्जेदार शिक्षण देता येईल. गेल्या पाच वर्षांपासून अशैक्षणिक कामे काढून घेण्याची मागणी केली जात आहे. एक शिक्षकी-दोन शिक्षकी शाळांवरचे चित्र आहे. त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होत आहे. - मच्छिंद्र गुरमे, शिक्षक परिषद
जनगणना, निवडणूक, आपत्ती व्यवस्थापनातील कामे सोडून सर्वच अशैक्षणिक कामांना शिक्षकांचा विरोध आहे. अनेकांना अध्यापन सोडून अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्यामुळे इतर शिक्षकांवर ताण वाढतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होतो. त्यामुळे अशैक्षणिक कामे शिक्षकांवर न देण्याची मागणी आहे. - मंगेश सुवर्णकार, बहुजन शिक्षक संसद
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे केवळ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात कामे शिक्षकांना देण्यात आली आहेत. आता शाळा नियमित सुरू झाल्यानंतर अध्यापनाची कामे सुरू राहतील. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १,२७८ शाळा असून, त्यामध्ये ५ हजार ८८१ शिक्षक कार्यरत आहेत. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी प्राथमिक