लातूर: मांजरा प्रकल्पात यंदा पाणीसाठा कमी असला तरी पाणीपट्टीची वसुली मोठ्या प्रमाणात झाली आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली झाल्याने लातूर पाटबंधारे विभागाला दिलासा मिळाला आहे. मांजरा प्रकल्पावरील बिगर सिंचन अर्थात पाणीपट्टीतून पाच कोटी ५७ लाख ७७ हजार १३० रुपये मिळाले आहेत. मांजरा प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणीपट्टीची एवढी मोठी वसुली झाली आहे.
लातूर महानगरपालिकेने १ कोटी ५२ लाख ७७ हजार ५५८ रुपये पाणीपट्टीचे भरले आहेत. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ लातूरने ३ कोटी ४४ लाख २० हजार ६५४ रुपये पाणीपट्टीचे पाटबंधारे विभागाकडे भरले आहेत. लातूरच्या या दोन संस्थांकडून सर्वाधिक पाणीपट्टी पाटबंधारे विभागाच्या मांजरा प्रकल्पाला मिळाली आहे. विशेष म्हणजे यंदा धरणात कमी पाणी साठा असताना बिगर सिंचनातून पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी पोटी रक्कम मिळाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निहाय मिळालेली पाणीपट्टी....लातूर महानगरपालिका : १कोटी ५२ लाख ७७ हजार ५५८महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लातूर : ३ कोटी ४४ लाख २० हजार ६५४अंबाजोगाई नगरपालिका : २४ लाख ८७ हजार १२२कळंब नगर परिषद : ९ लाख रुपयेकेज धारूर १२ गावे पाणीपुरवठा योजना : ६ लाख रुपये
पाणीपट्टी भरण्यासाठी संस्थांचा प्रतिसाद...मांजरा प्रकल्पावरील आठ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ५ कोटी ५७ लाख ७७ हजार १३० रुपयाची वसुली पाणीपट्टीतून झाली आहे. ही रक्कम पाटबंधारे विकास महामंडळाकडे जमा होते. त्यातील काही रक्कम प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मिळते. गतवर्षी चार कोटीच्या आसपास मांजरा प्रकल्पातून पाणीपट्टीची वसुली झाली होती. यंदा साडेपाच कोटी वसुली झाल्याने लातूर पाटबंधारे विभागाला दिलासा मिळाला आहे.