लातूर : औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासासाठी आवश्यक असलेली लातूरची विमानसेवा पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी आहे. मात्र, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीसह जमिनीचे अधिग्रहण रखडले आहे. याशिवाय, गेल्या १३ वर्षांपासून जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न जागेअभावी रेंगाळला असून, शाश्वत पाण्याचा प्रश्नही लालफितीत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रश्नांवर मार्ग निघेल, अशी अशा लातूरकरांना आहे.
लातूर-बार्शी महामार्गावर १२ नंबर पाटी येथे ३०० एकर क्षेत्रावर विमानतळ आहे. १९९८ मध्ये विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. काम पूर्ण झाल्यानंतर १० ऑक्टाेबर २००८ रोजी पहिल्या विमानाचे लँडींग झाले. वर्षभर लातूर-मुंबई विमानसेवा सुरू होती. त्यानंतर विमानसेवा बंद झाली. ७२ प्रवाशांचे विमान उतरू शकेल, अशी व्यवस्था या विमानतळावर आहे. मात्र, या-ना त्या कारणाने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची परवानगी रखडली आहे. त्यामुळे विमानसेवा रखडली आहे. धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण रखडलेले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजीमंत्री आ. अमित देशमुख यांना जमीन अधिग्रहणासह विमातळाचे उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कार्यारंभ झाला नाही. उड्डाण योजनेतंर्गत लातूरच्या विमानतळाला उभारी मिळेल, अशी आशा होती. पण ती अपेक्षाही पूर्ण झालेली नाही.
जिल्हा रुग्णालयाचे भिजत घोंगडेनांदेड रोडवरील कृषी महाविद्यालयाची दहा एकर जागा जिल्हा रुग्णालयाला देण्याचा करार झालेला आहे. मात्र, बाजार मूल्याप्रमाणे शासनाकडून कृषी महाविद्यालयाला पैसे मिळत नसल्यामुळे जागा हस्तांतरणाचा प्रश्न रखडलेला आहे. त्यामुळे गेल्या १३ वर्षांपासून रुग्णालयाविना आहे. जिल्हा रुग्णालय २००८ मध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मनुष्यबळासह वर्ग करण्यात आले. तेव्हापासून जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे. लातूरबरोबर नांदेड, अकोल्याचे रुग्णालय मंजूर झाले असून, ते कार्यान्वीतही झाले आहे.
२ कोटी ८२ लाख रुपयांमुळे अडले कामकृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या लातूरच्या कृषी महाविद्यालयाने दहा एकर जागा जिल्हा रुग्णालयाला देऊ केली आहे. पण, बाजार मूल्याप्रमाणे २ कोटी ८२ लाख रुपये द्या, अशी मागणी त्यांची आहे. शासनाकडून या दोन विभागांत सामंजस्य होत नसल्यामुळे लातूरचे जिल्हा रुग्णालय रखडले आहे.
उजनीच्या पाण्याचे नुसतेच गुऱ्हाळ२०१६ मध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर उजनीचे पाणी लातूरला देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी गेला. लातूर, बीड, धाराशिवसाठी ११२ दलघमी पाणी उजनीतून देण्यात यावे, याअनुषंगाने शासनस्तरावर चर्चा झाली. परंतु अद्याप लातूरच्या शाश्वत पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही.
या आहेत लातूरकरांच्या अपेक्षा- लातूर विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधी, तसेच उड्डाण योजनेंतर्गत देशांतर्गत विमानसेवा सुरू करावी.- जिल्हा रुग्णालयासाठी दहा एकर जागेचे हस्तांतरण करण्यात यावे.- तिसऱ्या टप्प्यातील एमआयडीसी विस्तारासाठी जमिनीचे अधिग्रहण करावे.- कमी पाणी लागणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहनपर योजना राबविण्यात याव्यात.- लातूरसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायी योजना राबवावी.- लातूर जिल्ह्यातील आठही मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा.- शैक्षणिक हब असल्याने लातूरला स्वतंत्र विद्यापीठ द्यावे.- विभागीय क्रीडा संकुलाचा दहा वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यात यावा.