लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : नीट गुणवाढीसंदर्भात लातुरात गुन्हा दाखल हाेण्याची कुणकुण लागताच इरण्णा काेनगलवारने काही वेळातच पाेलिसांना ‘चकवा’ देत लातूर साेडल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती आली आहे. त्याची गाडी काेणत्या महामार्गावरून सुसाट धावली याचा शाेध घेतला जात आहे. यासाठी लातूर, नांदेड, धाराशिव आणि साेलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या टाेल नाक्यावरील ‘सीसीटीव्हीं’च्या फुटेजची पाहणी केली जात आहेत. दिल्लीतील गंगाधर आणि लातुरात वास्तव्याला असलेल्या इरण्णाच्या शाेधार्थ तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या अटकेसाठी पथके उत्तराखंड, झारखंड व दिल्लीच्या दिशेने रवाना झाली आहेत.
कोणत्या मार्गाने झाला पसार?नांदेड येथील ‘एटीएस’ने लातुरात दिवसभर छापसत्र सुरू केल्यानंतर मुख्याध्यापक पठाण आणि शिक्षक जाधवला चाैकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच इरण्णा ‘एटीएस’ला चकवा देत निसटला. लातूर साेडताना त्याने काेणत्या मार्गावरून प्रवास केला? याचा माग पाेलिस काढत आहेत. यासाठी लातूरसह शेजारच्या जिल्ह्यातील महामार्गावरील टाेल नाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. यातूनच इरण्णाची गाडी काेणत्या महामार्गावरून सुसाट निसटली हे समाेर येणार आहे.
लातूरमधील आराेपींचे कनेक्शन हैदराबादमार्गे दिल्ली - नीट प्रकरणातील आराेपींची साखळी हैदराबादमार्गे दिल्लीपर्यंत पाेहोचली असल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. आराेपी एकमेकांशी कसे भटले, त्यांच्या कामकाजाची पद्धती कशी हाेती, याबाबत मंगळवारी घेतलेल्या जबाबातून काही खुलासे झाले आहेत. - आराेपी जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण आणि शिक्षक संजय जाधव हे दाेघेही उमरगा येथील आयटीआयमध्ये कार्यरत असलेला इरण्णा काेनगलवार याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची भेट लातुरात झाली. इरण्णा उमरग्याला नाेकरी असली तरी वास्तव्याला लातुरात हाेता. - पठाण, जाधव यांच्याकडून मिळालेली प्रवेशपत्रे इरण्णा दिल्लीला पाठवत. दिल्लीतील आराेपी गंगाधर हा हैदराबादमध्ये आला. त्याला भेटण्यासाठी लातूर येथून इरण्णा गेला हाेता, अशी माहिती पाेलिस चाैकशीत आराेपी शिक्षक संजय जाधव याने मंगळवारी दिली.- पठाण, जाधव हे दाेघेही लातुरात राहूनच काम करत हाेते, तर दिल्लीच्या गंगाधरशी मध्यस्थ म्हणून इरण्णाची जबाबदारी हाेती. आता इरण्णा आणि गंगाधर ताब्यात आल्यानंतरच नीट गुणवाढीचे पुढे काय कनेक्शन आहे हे स्पष्ट हाेणार आहे.