लातूर : एका आठवड्याची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी सहा हजारांची लाच स्विकारताना लातुरातील एका शाळेचा मुख्याध्यापक आणि लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात बुधवारी दुपारी अडकला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर येथील सदानंद प्राथमिक शाळेत तक्रारदार (वय ६३) यांची पत्नी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, शिक्षिकेने घरगुती कामासाठी एका आठवड्याची अर्जित रजा घेतली होती. ती मंजूर करण्याबाबत मुख्याध्यापकास विनंती केली. त्यावर त्यांनी टाळाटाळ केली. अखेर एक आठवड्याची अर्जित रजा मंजूर करण्याच्या कामासाठी तक्रारदाराच्या पत्नीला शाळेत बोलावून घेण्यात आले. यावेळी त्यांना पंचासमक्ष सात हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. शेवटी तडजोडीअंती सहा हजार रुपये देण्याचे ठरले.
याबाबत शिक्षिकेच्या पतीने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी दुपारी शाळेतच सापळा रचण्याचे नियोजन एसीबीने केले. शाळा सुटण्याच्या वेळी सहा हजारांची लाच स्विकारताना मुख्याध्यापक सुधाकर जगन्नाथ पोतदार ( वय ५५) आणि लिपिक शशिकांत विठ्ठलराव खरोसेकर (वय ५४) या दोघांना पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली. याबाबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती एसीबीचे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, अन्वर मुजावर यांच्यासह पथकाने केली.