लातूर : जिल्ह्यातील कुठल्याही ग्रामपंचायतींकडून नियमात नसलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण होऊ नये आणि भविष्यात वाद उद्भवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी ग्रामपंचायतीस कोणते दाखले देता येतात याचे परिपत्रकच काढले आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मनमानीस चाप बसणार आहे. निश्चित केलेल्या ३७ प्रकारच्या प्रमाणपत्राशिवाय अन्य प्रकारचा दाखला दिल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे विविध नाहरकत प्रमाणपत्र, दाखले, परवान्यात सुसूत्रता दिसून येत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांना सेवा घेताना विविध अडचणी येत होत्या. शिवाय, कालबध्द सेवा मिळत नव्हत्या. तसेच ग्रामपंचायतकडूनही नाहरकत दाखला देताना अर्जासोबत घ्यावयची हमीपत्रे, जोडपत्रे तसेच त्याचा कालावधी याबाबत संभ्रम दिसून येत होता. तो दूर व्हावा आणि विविध सेवा सुविधा पुरविताना सुसूत्रता व सुलभता यावी म्हणून अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. त्यानुसार ग्रामपंचायतींनी कोणकाेणती प्रमाणपत्रे द्यावयाची हे शासनाच्या निर्देशानुसार निश्चित करण्यात आले आहे.
३७ प्रकारचे मिळणार प्रमाणपत्र...जिल्ह्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीतून केवळ ३७ प्रकारचेच प्रमाणपत्र मिळणार आहेत. त्यात दुकान व्यवसाय नाहरकत, इमारत बांधकाम परवानगी, घर दुरुस्ती व वाढीव बांधकाम, बॅनर, होर्डिंग, फ्लेक्स नाहरकत, तलावातील गाळ उपसा नाहरकत, वृक्ष तोडणीस नाहरकत, बिनशेती नाहरकत, खडी क्रशरसाठी नाहरकत, मंगल कार्यालय, ढाबा- रेस्टॉरंट- हॉटेलसाठी नाहरकत, शववाहिनी दाखला, विविध कंपन्यांकडून गॅस पाईपलाईन जाळे उभारण्यासाठी नाहरकत, विद्युत पुरवठा, औद्योगिकरण इमारत बांधकाम, फटाका दुकान- गोदामास नाहरकत, विटभट्टी, खाजगी शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळेसाठी नाहरकत, वृध्दाश्रम/ अनाथ आश्रम नाहरकत, चार्जिंग स्टेशन बुथ, टोल प्लाझा नाहरकत, सण व उत्सवासाठी नाहरकत, पेट्रोल पंप, मोबाईल टॉवर, सौर उर्जा प्रकल्पासाठी नाहरकत, कत्तलखाना नाहरकत, गोशाळा नाहरकत, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, वराह पालनासाठी नाहरकत, दवाखाना नाहरकत, लोकनाट्य कला केंद्र नाहरकत, नवीन बोअरसाठी नाहरकत, गॅस सिलेंडर साठवणूक व पुरवठा नाहरकत, कृषी सेवा केंद्रासाठी नाहरकत.
महिनाभरात दाखला देणे बंधनकारक...३७ प्रकारापैकीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतीने तो दाखला ३० दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. तसेच प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची अर्जदाराने पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीस नाहरकत प्रमाणपत्र नाकारावयाचे असल्यास लेखी कारणे देऊन अर्जदारास कळविणे आवश्यक आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
सरपंच, ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीने परवाना..३७ पैकीचा परवाना हा सरपंच आणि ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीने दिला पाहिजे. प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्यासंदर्भातील ठराव मासिक सभेत घेणे अपेक्षित आहेत. कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याची यादी स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार प्रमाणपत्र द्यावेत. याशिवाय अन्य कुठले प्रमाणपत्र सरपंच, ग्रामसेवकांना देता येणार नाहीत. तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.