लातूर : महागाईने उच्चांक गाठला असून, दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गॅसची किंमत तर दर महिन्याला वाढत आहे. गेल्या महिन्यातच गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली होती. परत आता या महिन्यात पुन्हा २७ रुपयाने गॅस सिलिंडर महाग झाला आहे. मग आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या का, असा प्रश्न सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गृहिणींना पडला आहे.
गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या आणि गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता महागाईत भरडली जात आहे. कोरोनामुळे अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली असून, त्यातच महागाई होत आहे. गेल्या वर्षभरात दर महिन्याला गॅसची किंमत वाढली आहे. ८०० ते ८९५ रुपयांपर्यंत गॅसची किंमत गेली आहे. यावर सबसिडी तीन ते पाच रुपये आहे. सिलिंडर खरेदी केल्यानंतर एक-दोन दिवसात सबसिडी बँक खात्यावर जमा होते. पूर्वी दीडशे-दोनशे रुपये सबसिडी होती. मात्र, आता सबसिडी नाही उलट गॅस सिलिंडरची किंमत वाढविल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.
पुन्हा चुली पेटवाव्या लागतील...
गॅसच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सणासुदीच्या तोंडावर गॅस वाढल्यामुळे अडचण निर्माण झाली असून, चुली पेटविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने गॅस दरवाढ मागे घ्यावी. पाचशे रुपयांच्या आत गॅस सिलिंडरचा दर करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. - कल्पना गायकवाड
चुलीवरचा स्वयंपाक करावा लागेल...
गॅस महागल्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दर महिन्याला गॅस सिलिंडरची किंमत वाढत आहे. दरवाढीचा हा कळसच आहे. सर्वसामान्यांनी जगावे की न जगावे, अशी स्थिती आहे. किराणा साहित्याचे दरही वाढलेले आहेत. आता सण तोंडावर आहे, त्यात गॅसचा दर वाढला आहे. - संगीता जाधव