जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा दाखल
लातूर : कासारशिरसी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी एका किराणा दुकानदारावर गुन्हा नोंद करण्यात आला. स्वत: दुकान मालक मास्क न लावता निदर्शनास आला. शिवाय, दुकान उघडे ठेवण्याची ७ ते ११ ची वेळ असताना या वेळेपेक्षा अधिक कालावधीत दुकान चालू ठेवले. याबाबत सपोनि. रेवणनाथ कोंडिबा इमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष राजकुमार बोळशेट्टे (रा. कासारशिरसी, ता. निलंगा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भोपळ्याचा वेल तोडला म्हणून मारहाण
लातूर : हिप्पळगाव शिवारात धुऱ्यावरील भोपळ्याचा वेल का तोडतोस असे म्हणून शिवीगाळ करून एकाला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत महारुद्र शिवराज स्वामी (रा. हिप्पळगाव, ता. शिरूर अनंतपाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लिंगाप्पा शंकरप्पा स्वामी व अन्य दोघांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीला आरोपीने दगड घेऊन कपाळावर मारला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दुचाकीला कंटेनरची धडक; एक जण गंभीर
लातूर : भरधाव वेगातील कंटेनरने खानापूर फाटा रोडवर एमएच २४ एक्स ९४१८ या क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना २२ रोजी घडली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
फिर्यादी कलिम दस्तगीर शेख (रा. व्हटी, ता. रेणापूर) हे आपल्या चुलत भावासोबत एमएच २४ एक्स ९६१८ क्रमांकाच्या दुचाकीवर बसून व्हटी ते किनगावकडे जात होते. किराणा सामान आणण्यासाठी जात असताना खानापूर फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील एमएच ४६ बीएफ ६५१२ च्या चालकाने जोराची धडक दिली. या फिर्यादी व फिर्यादीचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाले. याबाबत कलिम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच ४६ बीएफ ६५१२ च्या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोना. जाधव करीत आहेत.
पाथरवाडी येथेही आदेशाचे उल्लंघन
लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध असताना अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन होत आहे. पाथरवाडी येथे रसवंतीचे दुकान चालू ठेवून तोंडाला मास्क न लावता गर्दी जमविल्याची घटना घडली. याबाबत पोहेकॉ. शंकर पांडुरंग हंगरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तू विठ्ठल गोडभरले (रा. पाथरवाडी, ता. रेणापूर) यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महादेव नगर येथे दुचाकीची चोरी
लातूर : शहरातील महादेव नगर येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ एझेड १८८९ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सुनील माणिक भोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोसई. परकोटे करीत आहेत.