राजकुमार जाेंधळे / निलंगा (जि. लातूर) : पत्नीसोबत झालेल्या भांडणातून पेट्रोल ओतून पत्नीला जाळणाऱ्या पतीला दाेषी ठरवत निलंगा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश स.तु. भालेराव यांनी जन्मठेपेसह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
फिर्यादी रमा संजय बोंडगे यांनी १० जानेवारी २०२२ राेजी पाेलिसांना दिलेल्या जबाबाप्रमाणे औराद शहाजानी पोलिस ठाण्यात संजय व्यंकटेशम बोंडगे याच्याविरुध्द कलम ३०७, ३२३,५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. ८ जानेवारी २०२२ रोजी ती माहेरी जाणार असल्याने औराद येथे भांडण झाले. दुपारी तीन वाजता पुन्हा भांडण झाले. रमा ही गॅससमोर भाजी करताना आराेपी पतीने तिच्यावर बाटलीतील पेट्रोल ओतले आणि गॅसचा भडका उडाला. ती स्वत:ला वाचविण्यासाठी मोठ्याने ओरडत हाेती. त्यावेळी आरोपीने अंगावर टॉवेल, चादर टाकली. इतरांनी मदत करुन रुग्णालयात दाखल केले. असा जबाब गांधी हॉस्पिटल सिकंदराबाद (तेलंगणा) येथे तिने दिला.
उपचारादरम्यान १२ जानेवारी रोजी रमा बोंडगे हिचा मृत्यू झाला. याबाबत औराद ठाण्यात गुन्हा दाखल केला. सपाेनि एस.ए. कामत यांनी तपास करुन आरोपीविराेधात निलंगा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात सरकार पक्षाच्या वतीने ९ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांपैकी मयत फिर्यादीचा पोलिसांसमक्ष नोंदविलेला मृत्युपूर्व जबाब आणि सिकंदराबाद येथील न्यायाधीशांनी नोंदविलेला मृत्युपूर्व जबाब व साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, मयताचा मुलगा, इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. निलंगा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश स.तु. भालेराव यांनी आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेपेसह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कपिल पंढरीकर यांनी काम पाहिले. त्यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एल.यू. कलकर्णी यांनी मदत केली. तर पैरवी पोलिस नाईक बी.एस. माने यांनी केली.