लातूर : चारित्र्यावर संशय घेत सतत मारझाेड करणाऱ्या, छळणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याच्या घटनेचा उलगडा चार दिवसांच्या तपासानंतर झाला. फिर्यादी पत्नीच खुनातील आराेपी निघाली असून, पाेलिसांनी चाैघांना अटक केली आहे. याबाबत गातेगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जाेडजवळा येथील विवाहितेने, शेतीच्या वादातून पतीचा नात्यातील काहींनी डाेक्यात काेयत्याने मारून खून केल्याची तक्रार गातेगाव पाेलिस ठाण्यात दिली हाेती. याबाबत गातेगाव पाेलिसांनी गुन्हा नाेंद केला हाेता. दरम्यान, तक्रारीत नमूद केलेल्या संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडे चाैकशी केली. गुन्ह्याच्या कारणांची, इतर बाबींचा तपास करताना मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आली.
त्यानुसार पुन्हा फिर्यादी पत्नीलाच विश्वासात घेत विचारपूस केली असता फिर्यादीनेच आई आणि अन्य दाेघा पुरुषांच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली. मयत पती हणमंत कटारे हा पत्नी पूजा हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत मारहाण करत होता. या छळाला कंटाळून आईसह इतर दोघांच्या मदतीने पतीचा खून केला. हा खून दुसऱ्या एका इसमानेच केल्याचा बनाव रचल्याचीही कबुली तिने दिली.
याबाबत राजेंद्र विद्याधर नितळे (वय ५४, रा. बोरगाव, ता. लातूर), दत्तात्रय नागनाथ लोंढे (वय ५५, रा. जागजी, जि. धाराशिव), निर्मला पांडुरंग दयाळ (५०, रा. ठोंबरेनगर, मुरुड, ता. लातूर) आणि फिर्यादी पूजा हणमंत कटारे (३०, रा. जोडजवळा, ता. लातूर) यांना अटक केली आहे. अधिक तपास गातेगाव पाेलिस करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, गातेगावचे सपोनि. ज्ञानदेव सानप, सपोनि. प्रवीण राठोड, संजय भोसले, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, राजेश कंचे, बंटी गायकवाड, प्रदीप चोपणे, शिरीष पाटील, वाल्मीक केंद्रे, दशरथ गिरी, रामदास नाळे, जीवन राजगीरवाड, अतुल पतंगे, संजय मोरे यांच्या पथकाने केली.