उदगीर ( लातूर ) : जिवंतपणीच पत्नीने पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र काढल्याच्या आरोपावरून उदगीर शहर पोलिसांनी गुरुवारी पत्नीला अटक केली आहे. या प्रकरणात पतीचा मृत्यू झाला असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या एका नगरसेविकेसह सात जणांविरुद्ध उदगीर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
उदगीर शहराच्या विकासनगर येथील परमेश्वर सुभाष केंद्रे यांचा विवाह चापोली(ता. चाकूर)येथील रामदास किशनराव चाटे यांची मुलगी राजश्री सोबत ११मे२०११रोजी झाला होता.२०१५साली पती परमेश्वरच्या वडिलांचे निधन झाले. २०१९साली भावाचे तर २०२०मध्ये आईचे निधन झाल्यानंतर पती परमेश्वर व पत्नी राजश्री यांच्यात बेबनाव सुरू झाला. यातून पत्नी राजश्री माहेरी निघून गेली.
या काळात पत्नी राजश्री हिने पती परमेश्वरच्या नावांवर असलेली प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशाने पतीचा मृत्यू झाल्याची बतावणी करून नगरपालिकेत पतीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. यासाठी एका नगरसेविकेने परमेश्वरचा मृत्यू झाला असल्याचे प्रमाणपत्र ही दिले. हे मृत्यू प्रमाणपत्र घेवून पत्नी राजश्रीने न्यायालयात वारसा प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. हे पती परमेश्वर याच्या निदर्शनास येताच त्यांनी शहर पोलिसात पत्नी, मयत प्रमाणपत्र देणारी नगरसेविका व यावर सह्या करणारे पाच पंच अशा सात जणांविरुद्ध रितसर फिर्याद दिली होती. नगर सेविकेस यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी असलेली पत्नी राजश्री हिस गुरुवारी पोलिसांनी अटक केली.