चाकूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा लढा लढला पाहिजे. कित्येक वर्षापासून हा आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी आहे. आता कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल, असे प्रतिपादन मनोज जरांगे -पाटील यांनी येथे केले.
चाकूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोसायटी चौकातील सभेत बोलताना ते म्हणाले, मराठा समाजात अनेक गोरगरीब लोक आहेत. सरकारने आता आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरुक राहिले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. समाजात दुफळी निर्माण होणार नाही. यासाठी समाजातील प्रत्येकांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सकल मराठा समाजाचे संयोजक लक्ष्मण धोंडगे, प्रताप सूर्यवंशी, कृष्णा धोंडगे, वैभव धोंडगे, विष्णू फरकांडे, अविनाश भोरे, धनंजय धोंडगे, महेश सोमवंशी, महेश साळुंके, विवेक शिंदे, नितीन शिंदे, भागवत सूर्यवंशी, सचिन साळुंके, गणेश भोसले, सुमित होनकर, शंकर मोरे, विनोद फुले, युवराज भोसले, गजानन शिंदे, सचिन जाधव आदींसह समाजबांधवांची उपस्थिती होती. दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या जाहीर सभेला समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.