औसा नगरपालिकेला शंभर कोटी देणार; कामे दर्जेदार करा, निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 06:56 PM2021-12-11T18:56:34+5:302021-12-11T18:57:42+5:30
Ajit Pawar : कोविडमुळे राज्याचे अर्थचक्र मंदावले आहे. अजूनही हे संकट टळले नसून, जनतेने जबाबदारीने वागावे, संकटाचा मुकाबला करणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असून, यात राजकारण करु नका
औसा (जि.लातूर) : शहरातील विकासाची कामे दर्जेदार झाली पाहिजेत तसेच वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. विकास कामासाठी येणारा पैसा हा जनतेच्या कष्टातून येतो याचा विसर पडू देऊ नका. औशाच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी येथे दिले.
औसा येथील नगरपालिकेच्या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मंचावर राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आ. विलास लांडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, संजय शेटे, सुरज चव्हाण, आशाताई भिसे, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महमदखाॕ खान पठाण, मुख्याधिकारी वसुधा फड, उपनगराध्यक्ष कीर्ती कांबळे, तालुकाध्यक्ष सुभाष पवार यांची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही लोक उघड्यावर शौचास बसतात. ही लाजिरवाणी बाब आहे. स्वच्छता अभियानामध्ये एकदाच पारितोषिक मिळवून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी जनतेने ही आपली जबाबदारी पार पाडावी. कोविडमुळे राज्याचे अर्थचक्र मंदावले आहे. अजूनही हे संकट टळले नसून, जनतेने जबाबदारीने वागावे, संकटाचा मुकाबला करणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असून, यात राजकारण करु नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला प्रत्येकी ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. प्रास्ताविकात नगराध्यक्ष डॉ. शेख म्हणाले, शहर विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला. कामे मार्गी लावण्यासाठी पाठबळ दिले. शहर विकासाचे श्रेय सर्वाधिक त्यांनाच आहे.
भरघोस निधी देऊ...
आगामी निवडणुकीत डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली टीमला पुन्हा संधी द्या. शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले. नगराध्यक्ष डॉ. शेख शहराच्या विकासासाठी झपाटलेला माणूस आहे. शहरातील भुयारी गटार योजना, नवीन वस्तीमध्ये पाणी वितरण व्यवस्था, रस्ता रुंदीकरणाचा तिसरा टप्पा अशा विविध विकास कामासाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रकल्पांचे झाले उद्घाटन...
औसा शहरात नगरपालिकेने उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र, व्यापारी संकुल, सांस्कृतिक सभागृह, किल्ला मैदान ते नगरपरिषद कार्यालय मुख्य रस्ता, ऊर्जा प्रकल्प, कर्मचारी निवासस्थान, आठवडी बाजार विकसित करणे आदी विविध विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.