लातूर : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत जिल्हास्तरावर औसा तालुक्यातील उटी बु. हे गाव प्रथम आले आहे. त्यामुळे या गावास ५० लाखांचे तर तालुकास्तरावर दहा गावे अव्वल ठरल्याने त्या गावांना प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण १० गावांसाठी एकूण १४० लाख रुपये मिळणार असल्याने या गावांसाठी ही दिवाळी भेटच ठरत आहे.
राज्य शासनाच्या वतीने आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबविण्यात येते. सन २०२०- २१ च्या या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० तालुक्यातील एकूण ७८५ पैकी दहा गावांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत स्वच्छता, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, इंटरनेट वापर, बायोगॅस, वृक्ष लागवड व संवर्धन, शाळा- अंगणवाडीचा दर्जा, शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आदी बाबींची तपासणी करण्यात आली होती. त्यात तालुकास्तरावर वायगाव (ता. अहमदपूर), उटी बु. (ता. औसा), आटोळा (ता. चाकूर), नागतीर्थवाडी (ता. देवणी), चिंचोली (ता. जळकोट), खाडगाव (ता. लातूर), पानचिंचोली (ता. निलंगा), घनसरगाव (ता. रेणापूर), कानेगाव (ता. शिरुर अनंतपाळ) आणि डाऊळ (ता. उदगीर) ही गावे प्रथम आली. त्यामुळे या गावांना प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.
दरम्यान, जिल्हास्तरीय पथकाने सप्टेंबरमध्ये तपासणी करुन त्याचा अहवाल सीईओ अभिनव गोयल यांच्याकडे सादर केला. त्यात औसा तालुक्यातील उटी बु. हे गाव प्रथम आले आहे. त्यामुळे या गावास ४० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गतच्या स्पर्धेत निवड झालेल्या या गावांना विकासासाठी एकूण १४० लाखांचा निधी मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी सांगितले.
उटीचा इतर गावांनी आदर्श घ्यावा...सुंदर गाव पुरस्कार योजनेत जिल्हास्तरावर उटी बु. हे गाव आले आहे. या गावास तालुकास्तरावरचे १० लाख आणि जिल्हास्तरावरचे ४० लाखाचे बक्षीस मिळणार आहे. या गावाचा जिल्ह्यातील इतर गावांनी आदर्श घेऊन कार्य करावे. बक्षिसापोटी मिळणारा निधी हा विकास कामासाठी वापरता येणार आहे.- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी.
विकास कामांसाठी मदत...जिल्ह्यातील १० गावांना लाखो रुपयांचा निधी मिळणार आहे. तसेच योजनेंतर्गत सन २०२१-२२ चीही तपासणी झाली आहे. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते या गावांचा गौरव होणार आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.