- हरी मोकाशे ( लातूर )
शिक्षक म्हणून उदगीर, (जि. लातूर) येथे नोकरी सुरू केली़ परंतु दहा महिन्यांतच नोकरीवर पाणी सोडले़ विदेशातील शेतीचे तंत्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील शेती पाहून हेर (ता़ उदगीर) येथील शेतकरी बाबासाहेब पाटील यांनी शेतीत आधुनिक प्रयोग करण्यास सुरुवात केली़ त्याची फळेही मिळू लागली़ गावातील जवळपास पन्नासपेक्षा अधिक शेतकरी आपल्या शेतीत आधुनिक प्रयोगाद्वारे चांगले उत्पन्न घेत आहेत़
हेर येथील बाबासाहेब बाळासाहेब पाटील यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे़ प्रारंभी ते शिक्षक म्हणून रुजू झाले़ परंतु संपूर्ण बालपणापासूनच शेतीची आवड होती़ त्यामुळे त्यांनी अवघे दहा महिने नोकरी करून शेतीकडे वळले़ एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या पाटील यांना ४५ एकर शेती आहे़ गावातील जनावरांना चारण्याचे कुरण म्हणजे पाटील यांचे शेत, अशी ओळख होती़ सुरुवातीस त्यांनी पारंपरिक शेतीस सुरुवात केली़ परंतु त्यातून बहुतांश वेळा खर्चही पदरी पडत नव्हता़ त्यामुळे त्यांनी विदेशातील शेतीतंत्राची माहिती घेण्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आधुनिक शेतीची पाहणी केली़ २००३ मध्ये ठिबक सिंचनचा अवलंब करून ६ फूट रुंदीच्या काकऱ्या सोडून ऊस लागवड केली़ पहिल्याच प्रयोगात एकरी ८० टन ऊस उत्पादन मिळाले़
दरम्यान, त्यांनी सोयाबीन, हरभरा ही पारंपरिक पिके घेण्याबरोबरच अद्रकाचे उत्पादन घेतले़ तेव्हा हरभऱ्याला एकरी १४ क्विंटल व अद्रकाला एकरी दीडशे क्विंटल उतारा मिळाला होता़ ज्वारी, हरभरा या पिकांबरोबरच २००५ मध्ये तीन एकरांवर द्राक्ष लागवड केली़ त्यासाठी त्यांनी गावरान आणि हिरवळीच्या खताचा जास्तीत जास्त वापर केला़ त्यातून त्यांना १० लाखांचे उत्पन्न मिळाले़ त्यामुळे ते फळबागेकडे वळले़ आजघडीला ७ एकरवर केळी असून, त्यातून १० लाख, पाच एकर द्राक्षातून १० लाख, ३ एकर टरबुजातून ३ लाख, ३ एकर पपईतून ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे़ याशिवाय, ३ एकरवर टोमॅटो, १० एकरवर बेडवरील हरभरा, ३ एकरवर बडी ज्वारी आहे़ वर्षाकाठी खर्च वगळता ३० लाखांपर्यंत नफा होत असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले़ त्यांच्या शेतात दीड कोटी लिटरचे शेततळेही खोदले आहे.
या आधुनिक प्रयोगाचे अनुकरण गावातील जवळपास ५० पेक्षा अधिक शेतकरी करीत आहेत़ या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात़ या कार्याची दखल घेऊन शासनाने बाबासाहेब पाटील यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. पाटील यांनी जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घेतले आहे़ अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने नगदी पीक असलेले ऊस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन घेणे त्यांनी दोन वर्षांपासून बंद केले आहे़ वर्ष- दोन वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये़ कोरडवाहू शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी बोर, सीताफळ अशा फळबागांची लागवड करावी़ त्यामुळे इतर पिकांच्या तुलेनत या फळांपासून अधिक उत्पन्न मिळते, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले़