बेलकुंड/ उजनी (जि़ लातूर) : औसा तालुक्यातील तावशी ताड येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याने गावातील संतप्त महिलांनी गुरूवारी सकाळी दारूविक्रेत्यांना पकडून डांबून ठेवले़ पोलिसांना कळवूनही ते लवकर आले नसल्याने विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली़ त्यानंतर संतप्त महिलांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला़
तावशीताड येथे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ठोक दारूविक्री करणारा एक विक्रेता आला़ यावेळी महिलांनी त्याला हटकले असता त्याच्याकडे दारूच्या बाटल्या होत्या़ त्यामुळे त्याला ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले़ भादा पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती देऊन सकाळी ११ वाजेपर्यंत पोलीस आले नसल्याने संतप्त महिलांनी रास्ता रोको करीत दारूविक्रेत्याला मारहाण केली़ त्यानंतर घटनास्थळी भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार आपल्या तीन सहकाऱ्यांसह गावात आले़ यावेळी ग्रामस्थांनी जाब विचारला असता वाद उद्भवला़ औसा पोलीसही घटनास्थळी पोहचले़ संतप्त महिलांची समजूत काढत गावातील जवळपास ४ ते ५ दारूविक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले़
जवळपास २ ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून अनाधिकृतपणे जवळपास ८ ते १० जण दारूविक्रीचा व्यवसाय करतात़ त्यामुळे गावातील तरूण व्यसनाधीन झाले आहेत़ अनेकांचा संसारही दारूमुळे उध्वस्त झाला आहे़ महिलांसह ग्रामस्थांनी दारू बंद करावी, ंयासाठी अनेकदा पोलीस अधीक्षक, उपाधीक्षकांसह भादा पोलिसांकडे गेले़ मात्र यावर किरकोळ कारवाई झाली़ वारंवार तक्रार करूनही दारूबंंदी होत नसल्याने ग्रामस्थ संतापले आहेत़ विशेष म्हणजे, महिलांनी पुढाकार घेत पोलिसांना धारेवर धरले आहे़