ऑनलाइन लोकमत
देवणी, दि. 24 - देवणी तालुक्यातील भोपणी येथील तरुणीचा गेल्या काही दिवसांपासून संदीप दोडके याने छळ सुरू केला होता. सातत्याने होणारी छेडछाड आणि छळाला कंटाळून अखेर या तरुणीने सोमवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तरुणीच्या पित्याने मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
देवणी तालुक्यातील भोपणी येथील रुपाली श्रीधर जवळदापके या मुलीचे पाहुण्यातीलच मुलाशी लग्न जुळले होते. यानंतर संदीप बालाजी दोडके (२४) याने रुपालीचा छळ करण्यास सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून संदीप दोडके हा रुपालीच्या मागावर होता. यातूनच त्याने अनेकदा रुपालीला रस्त्यात अडवून तिची छेडछाड केली. मुलीचे लग्न व्हायचे आहे म्हणून मुलीकडील कुटुंबियांनी या प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने घेतले नाही. यातूनच संदीप दोडकेचे धाडस वाढले. त्याने रुपालीच्या नियोजित पतीलाही फोन करून शिवीगाळ करीत रुपालीशी लग्न केल्यास तुला जिवंत जाळून टाकतो, अशी धमकी दिली. यानंतर रुपालीच्या मनावर या सगळ्या घटनांचा विपरित परिणाम झाला. यातूनच रुपालीने आपल्या राहत्या घरी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रुपालीचे वडील श्रीधर बळीराम जवळदापके यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात आरोपी संदीप बालाजी दोडके याच्याविरुद्ध ३५४, ३०६, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोपणी येथील रुपाली जवळदापके या मुलीने संदीप बालाजी दोडके याच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधात पोलीस पथक तैनात आहे. संदीपने नियोजित पतीलाही जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. यातूनच रुपालीने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.