लातूर : घरगुती पिठाच्या गिरीच्या पट्ट्यामध्ये ओढणी अडकल्याने, एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना लातुरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रविवारी आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अश्विनी बालाजी ढाेकरे (वय ३१) असे मयत महिलेचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील आर्वी भागात असलेल्या अहिल्यादेवी हाेळकरनगर येथे वास्तव्याला असलेल्या अश्विनी बालाजी ढाेकरे या शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका म्हणून कार्यरत हाेत्या. दरम्यान, त्या दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयातून घरी परतल्या. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील पिठाची गिरणी सुरू केली. धान्य दळत असताना घरगुती पिठाच्या गिरणीच्या पट्ट्यामध्ये अचानक त्यांची ओढणी अडकली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना अंबाजाेगाई महामार्गावरील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी अश्विनी बालाजी ढाेकरे यांना मयत घाेषित केले.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात डाॅ. महेश भुजंगे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे, अशी माहिती पाेलिसांनी दिली. तपास पाेलिस हेड काॅन्स्टेबल जी.एम. बिराजदार करत आहेत.