लातूर : औसा तालुक्यातील भेटा, वडजी, आंदोरा, बोरगाव (न.), नाव्होली, भादा भागात शनिवारी सांयकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात वडजी शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलेवर वीज पडल्याने वैशाली तानाजी मुळे (वय ३४) यांचा सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जागीच मृत्यू झाला.
मागील दोन दिवसापासून औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागात गारपीटही झाली. परिणामी नांदुर्गा, गुबाळ, मंगरूळ, फत्तेपुर, लामजना, दावतपुर, किल्लारी, भेटा, वडजी, वानवडा यासह तालुक्यातील बागायती शेतीचे नुकसान झाले. यात केळी, द्राक्ष, आंबे, टरबुज, खरबूज, काकडी,ज्वारी, गहू,आदी पिकांचा समावेश आहे.तर जनावरांना ठेवण्यात आलेल्या चाराही भिजल्याने शेतकरी चिंतातूर आहे.
दाेन मुलांचा आधार हरपला..
वडजी येथील वैशाली तानाजी मुळे यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना दोन मुले आहेत. शनिवारी वीज पडल्याने १३ व ११ वर्षीय मुलांच्या आईचाही मृत्यू झाला. त्यामुळे ही दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मयत वैशाली मुळे यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.