उदगीर : येथील सामान्य रुग्णालयात तालुक्यातील वागदरी येथील प्रसूतीसाठी दाखल झालेल्या २५ वर्षीय महिलेचा प्रसूती पश्चात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने शहर पोलिसात दिलेल्या जबाबात केला आहे.
पोलिसांनी सागितले, उदगीर तालुक्यातील वागदरी येथील पल्लवी कुणाल मोरे वय (२५ ) या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात बुधवारी सकाळी दाखल करण्यात आले होते. नैसर्गिक प्रसूती होत नसल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. तद्नंतर महिलेची तब्येत खालावल्यामुळे तिला उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारा दरम्यान दुपारी ४ वाजण्याच्या या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिस ठाण्यात रात्री अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप...
मयत महिलेच्या पतीने शहर पोलिस स्टेशनमध्ये सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व खासगी डॉक्टरांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. महिलेच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी रुग्णालयात नातेवाइकांची समजूत काढली. लेखी जबाब देण्यास सांगितल्याने पती कुणाल मोरे यांनी पोलिसांना जबाब दिला आहे. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. गुरुवारी दुपारी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कविता जाधव करीत आहेत.