लातूर : तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायची आहे, असे म्हणून एका महिलेने व्यापाऱ्याला गाेड बाेलून लाडी-गुलाबी लावली. या गाेड बाेलण्याला भुललेल्या व्यापाऱ्याने प्रतिसाद देत विचारलेली माहिती दिली. त्यानंतर काही वेळात बॅक खात्यातील १८ हजार रुपये क्षणात गायब झाले. हा प्रकार उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे घडला. दिशाभूल करुन, गाेड बाेलून एका महिलेने क्रेडिट कार्ड क्रमांक आणि ओटीपी मिळवून बँक खात्यातील रक्क्म ऑनलाइन काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात महिलेविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी राम गाेविंद कुंडगीर (वय ४०, रा. कल्लूर, ता. उदगीर) हे व्यापारी आहेत. त्यांना ६ एप्रिल राेजी एका अनाेळखी महिलेचा माेबाइलवर फाेन केला. तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवते म्हणून तिने गाेड-गाेड बाेलण्याला सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादीने महिलेच्या बाेलण्यावर विश्वास ठेवत विचारलेला क्रेडिट कार्ड क्रमांक आणि माेबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगितला.
फाेन बंद झाल्यानंतर काही क्षणात फिर्यादीच्या ॲक्सिस बँक खात्यातील १८ हजार २३० रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना घामच फुटला. याबाबत त्यांनी वाढवणा पाेलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याबाबत अज्ञात महिलेविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.