किल्लारी (जि़ लातूर) : गावातील अवैध दारु व अन्य अवैध धंदे बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी औसा तालुक्यातील हरेगाव येथील महिलांनी बुधवारी किल्लारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले़
पंचायत समिती सदस्या शिवगंगा मुडबे व हरेगावच्या सरपंच सरस्वती पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़ औसा तालुक्यातील हरेगाव व परिसरात गेल्या काही वर्षांपासून अवैध दारुविक्री होत आहे़ तसेच अवैध धंदे सुरु आहेत़ त्यामुळे गावात मद्यपींची संख्या वाढत असून संसार उध्दवस्त होत आहेत़ गावातील तरुणही दारुच्या आहारी जात असल्याने तंट्यांचे प्रमाण वाढले आहे़ दारुसाठी काहीजण घरातील वस्तूंची विक्री करीत आहेत़ महिलांसह शालेय विद्यार्थ्यांना ये- जा करीत असताना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे़
गावात चार ते पाच ठिकाणी अवैध दारुविक्री करण्यात येत आहे़ त्यामुळे गावात तळीरामांची संख्या वाढली आहे़ हे गाव औसा- गुबाळ मार्गावर असल्याने प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे़ अवैध दारुमुळे गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे़ त्यामुळे अवैध दारुविक्री बंद करण्यात यावी, अशी वारंवार मागणी होत आहे़ दरम्यान, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पोलीस ठाण्याकडे यापूर्वी तक्रारी केल्या होत्या़ परंतु, त्याची दखल घेण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी अखेर बुधवारी किल्लारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले़
यावेळी सपोनि मेत्रेवार यांना निवेदन देण्यात आले़ त्यावर पंचायत समिती सदस्या शिवगंगा मुडबे, सरपंच सरस्वती पवार, संपता सगर, अनिता मत्ते, छाया माने, अनुसया पवार, सखुबाई डोंगरे, पार्वती कोव्हाळे, निलाबाई डोगरे, छाया कोव्हाळे, ताराबाई कुंडकर, साधना जाधव, भारतबाई पवार, भागिरथी सगर, वनिता सुरवसे, राजश्री सुरवसे, सुमनबाई मंठाळकर, अरविंद कोव्हाले, अरुण कोव्हाळे, सिताराम कोव्हाळे, गणेश सौने, सुरेश डोंगरे, तुकाराम डोंगरे, अतुल डोंगरे, नामदेव डोंगरे, धनाजी कोव्हाळे, शिवाजी कोव्हाळे, करण कोव्हाळे, प्रताप कोव्हाळे, तानाजी कोव्हाळे, प्रवीण कोव्हाळे, संतोष कोव्हाळे, शिवहार कोव्हाळे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महिलांचे तासभर ठिय्या आंदोलऩहरेगावातील अवैध दारुविक्रीसह अन्य अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी करीत महिला व नागरिकांनी तासभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले़ दरम्यान, सपोनि मेत्रेवार व पीएसआय गणेश कदम यांनी संतप्त महिला व नागरिकांना शांत करुन लवकरच अवैध दारुविक्री बंद करण्यात येईल, असे सांगितले़