औराद शहाजानी : महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारप्राप्त जिजाबाई दिगंबरराव गायकवाड (रा. हलगरा, ता. निलंगा) यांचे रविवारी निधन झाले. मंगळवारी तिसऱ्या दिवशी त्यांची राख सावडून नातेवाईकांनी ती नदीत न टाकता त्याच वृक्षारोपण केले. त्यानंतर १३ व्या दिवसासाठीचा होणारा खर्च आणि अन्य रक्कम असे एकूण २ लाख २५ हजार रुपये गावातील स्मशानभूमीसाठीच्या दुरुस्तीसाठी गायकवाड कुटुंबियांनी दिले आहे. प्रगतशील शेतकरी मातेचा महिला दिनी मुलांनी केलेला सन्मान हा समाजासाठी आदर्शवत आहे.
निलंगा तालुक्यातील हलगरा येथील माजी कृषी अधिकारी अनंतराव गायकवाड यांच्या मातोश्री जिजाबाई दिगंबरराव गायकवाड यांचे रविवारी निधन झाले. मंगळवारी राख सावडण्याचा दिवस होता. प्रथेप्रमाणे राख सावडल्यानंतर गायकवाड परिवाराने सर्वांसाठी प्रेरणादायी निर्णय घेतला. त्यात राख नदी, नाल्यात न टाकता त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करुन तिथेच टाकली आणि १३ व्यासाठी होणारा खर्च जवळपास १ लाख रुपये मुलगा अनंतराव गायकवाड यांनी आणि आणखीन सव्वा लाख रुपये गायकवाड परिवार, पै- पाहुणे, मित्र मंडळी, सोयऱ्यांनी गावातील स्मशानभूमीच्या डागडुजीसाठी देण्याचे जाहीर केले. ही रक्कम महिला दिनी सरपंच योगेश पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय, गायकवाड कुटुंब हे जवळपास शंभर उंबरठ्याचे असल्याने केवळ अगदी जवळच्या चारच कुटुंबातील सदस्यांनी प्रथेप्रमाणे विटाळ पाळावा. अन्य कुटुंबियांना कुठलेही बंधन राहणार नाही, असे सांगितले.
आईच्या स्मरणार्थ घेण्यात आलेला हा निर्णय सर्वांसाठी मैलाचा दगड ठरणारा आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून स्मशानभूमीची डागडुजी होईल. आणखीन जास्त खर्च येणार असल्यास ग्रामपंचायत, गावातील दानशूरांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी अनंतराव गायकवाड, श्रीमंत गायकवाड, गुणवंत गायकवाड, व्यंकटराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विजयकुमार गायकवाड, श्रीमंत गायकवाड, नंदकुमार गायकवाड, सुरेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, गोविंद गायकवाड, शिवाजी गायकवाड, बालाजी गायकवाड, तानाजी गायकवाड, आशिष गायकवाड, प्रशांत गायकवाड, जगदीश गायकवाड, सत्यवती जाधव, छायाताई आरीकर, शोभा ढोक यांच्यासह गायकवाड परिवाराने या निर्णयाला सहमती दर्शविली.