वलांडी : देवणी तालुक्यातील लांबोटा-तोगरी या रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करून तीन महिन्यांपासून हे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
काहीजण खड्ड्यात पडून जखमी झाले असून, रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
लांबोटा-तोगरी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या भिज पावसात दुचाकी घसरून अपघात होत आहेत. हा रस्ता पूर्णपणे उखडून त्यावर काळी माती टाकण्यात आली आहे. त्यामुळे वाहने घसरून काही जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम केल्यानंतर मुरूम टाकण्यात आला नाही. त्यामुळे सध्या चिखलच चिखल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कार्यप्रणालीमुळे राज्यमार्ग क्रमांक २३८ लांबोटा ते तोगरी रस्त्याचे अनेक दिवसापासून बंद असलेले काम त्वरित सुरू करावे अशी मागणी होत आहे. वलांडी येथूनच पाच किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते. बाजारपेठेसाठी सक्षम म्हणून या भागात वलांडीची ओळख आहे. या रस्त्याचे काम रखडल्याने याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून, रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
आंदोलन करूनही काम सुरू होईना...
लांबोटा-तोगरी रस्त्याच्या कामासाठी मागील महिन्यात नागरिकांच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. मात्र, तरीही याची दखल घेतली गेलेली नाही. रस्त्यावर मुरुमऐवजी काळी माती टाकली असल्याने वाहने घसरत आहेत. परिणामी, अपघाताचा धोका वाढला असून, सध्या सुरू असलेल्या भिज पावसामुळे दुचाकीचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.