लातूर : ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण करून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला चालना देण्यात येत आहे. यासाठी लातूर तालुक्यातील कव्हा येथील राजीव नगर जि.प. शाळेतील शिक्षिका माधुरी बनसोडे परिश्रम घेत असून, त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनास मदत होत आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे सध्या ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. मात्र, ज्या विद्यार्थी, पालकांकडे मोबाईल आहेत ते ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहत आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी माधुरी बनसोडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले आहे. विविध नवोपक्रम राबवित त्यांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला चालना दिली. विज्ञान प्रदर्शन, शाळेतील विविध स्पर्धा, कार्यानुभवातून सण-उत्सवासाठी लागणारी साहित्यकृती तयार करणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रदर्शन, पालकांसाठी संवाद मेळावा आदी उपक्रम आतापर्यंत राबविले असून, प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत साजरा केला जातो. कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले. कव्हा येथील राजीव नगर जि.प.शाळेची नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे बाला उपक्रमासाठी निवड झाली आहे. त्याअंतर्गत शिक्षक, ग्रामस्थांचा लोकसहभाग यातून शाळेचा कायापालट केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी वक्तृत्व, वादविवाद, नृत्य, वेशभूषा, गीतगायन आदी स्पर्धांचे आयोजन केले असून, तालुकास्तरावरही विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये यश संपादन केले असल्याचे शिक्षिका माधुरी बनसोडे यांनी सांगितले.
नाविन्यपूर्ण उपक्रमावर भर...
सध्या कोरोनामुळे शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे, यासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा नाही त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अध्यापनाचे कार्य सुरू आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडविण्यावर भर आहे. प्रत्यक्ष वर्ग कधी सुरू होतात याची प्रतीक्षा असून, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे माधुरी बनसोडे यांनी सांगितले.