लातूर : यंदा पावसाने ताण दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अशा परिस्थितीत थकीत पीककर्ज वसुलीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा शेती उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
यंदा पाऊस उशिरा झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने खरिपाच्या उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. त्यानंतरही पावसाने उघडीप दिल्यामुळे पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष कसे काढावे, अशी भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे. उजाडलेला प्रत्येक दिवस कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.
चाकूर येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. याअंतर्गत जानवळ, शिवणखेड, शिवणी, रायवाडी, रामवाडी, केंद्रेवाडी, महाळंगी अशी गावे जोडण्यात आली आहे. या गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या वतीने पीककर्जाचे वाटप करण्यात येते. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत कर्ज वाटप करण्यात आले. मात्र, काही शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने आता वसुली मोहीम सुरू केली आहे.
बँक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत...सध्या शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी, कर्मचारी हे थकीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. शेतकऱ्यांना बोलावून घेऊन घरासमोर थांबलेले फोटो घेत आहेत.
तत्काळ वसुली थांबवावी...पाऊस नसल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी थकीत पीककर्ज वसुलीसाठी घरापर्यंत येत आहेत. शासनाने ही वसुली थांबवावी. दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी.- दत्तात्रय पवार, शेतकरी
१० कोटींची थकबाकी...जानवळ परिसरातील जवळपास २ हजार शेतकऱ्यांकडे दोन-तीन वर्षांपासून पीककर्ज थकीत आहे. ते जवळपास १० कोटी आहे. वसुलीसाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. थकबाकीदारांनी तत्काळ पीककर्जाची परतफेड करावी.- सूरज बिडवे, बँक मॅनेजर