लातूर : शाळेतील विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. या सुटीत मुले घरी खेळण्यातच वेळ घालवतात. कोरोनामुळे मागील दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे ही उन्हाळी सुटी वाया न घालवता विद्यार्थ्यांचा घरच्या घरीच सुटीत पालकांनी अभ्यास घ्यावा, यासाठी डायटतर्फे ‘होय मी जबाबदार पालक’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
यामध्ये पाच आठवड्यांचा अभ्यासक्रम देण्यात आला असून, सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली व दुसरीसाठी रंगभरण, भाजी व धान्य निवडणे, घर व परिसराच्या स्वच्छतेसाठी मदत करणे, झाडांना पाणी घालणे, काड्या, तिकीटे, चित्रे, बियांचा संग्रह करणे, घरातील व्यक्तीबरोबर फिरायला जाणे, माती, कागदापासून वस्तू तयार करणे, संगीत गाणी, कविता ऐकणे, म्हणणे आदी उपक्रम पालकांना घरच्या घरीच राबवायचे आहेत.
तिसरी व चौथीसाठी चित्रे, बिया, नाण्याचा संग्रह, दररोज एक चित्र काढणे, रंगविणे, नक्कल करणे, पक्ष्यांचे आवाज काढणे, कथा सांगणे, ऐकणे, दररोज दहा इंग्रजी शब्द म्हणने, समानार्थी, विरोधार्थी पाच शब्द आदी अभ्यास आहे. पाचवी आणि सहावीसाठी दैनंदिनी लिहिणे, पक्ष्यांसाठी चारापाणी ठेवणे, दररोज एका पाठाचे वाचन, तीन ते चार शब्दांपासून गोष्ट तयार करणे, दररोज इंग्रजीचे २० शब्द लिहिणे, पाच वाक्यांचे भाषांतर करणे, क्षेत्रभेट आदी उपक्रम आहेत. सातवी आणि आठवीसाठी दररोज २० शब्द लिहिणे, दहा वाक्यांचे भाषांतर करणे, इंग्रजीच्या एका उताऱ्याचे वाचन करणे, इंग्रजीत दहा मिनिटे संभाषण करणे, शब्दांचे झुंबर बनविणे, योगासने, प्राणायाम, व्यायाम, सार्वजनिक कामात स्वयंसेवक म्हणून काम करणे, अभिनय करणे, गायन, संगीत, वादन, सायकल, पोहायला शिकणे, दररोज दहा गणिते सोडविणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. एक ते पाच आठवडे या उपक्रमांची अंमलबजावणी पालकांना करावी लागणार आहे.
मुलांचा आत्मविश्वास वाढेल...‘होय मी जबाबदार पालक’ अभियान उन्हाळी सुटीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात आहे. या उपक्रमामुळे पालक आपल्या पाल्यांचा घरीच अभ्यास घेणार आहेत. यासाठी पाच आठवड्यांचा अभ्यासक्रम डायटतर्फे देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी जागरूकता निर्माण होणार आहे. पालकांसाठीची कृतिपत्रिका शाळांना देण्यात आली असून, तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे.- डॉ. भागिरथी गिरी, प्राचार्या, डायट