लातूर : उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यास स्वारातीम विद्यापीठाकडून विलंब केला जात आहे, असा आरोप करीत युवा सेनेच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्रासमोर आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा सेनेचे सहसचिव तथा सिनेट सदस्य प्रा. सूरज दामरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी, राहुल मातोळकर, रमण माने, श्रीनिवास नरहरे, सौरभ बुरबुरे, विष्णू तिगिले, आकाश मासाने, स्वप्नील बेंडगे, संतोष माने, रमेश गडगिले, कृष्णा चव्हाण, अमोल सूर्यवंशी, आकाश पाटील, आॅटो सेनेचे अध्यक्ष त्र्यंबक स्वामी, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी करपुरे आदी उपस्थित होते.
लातुरातील एका महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिकृत उत्तरपत्रिका तपासणी केंद्र असताना या केंद्रावर उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावून गुणांत छेडछाड करण्यात आली तसेच पुनर्मूल्यांकनात ठराविक विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आल्याची तक्रार प्रा. सूरज दामरे यांनी राज्यपाल आणि कुलगुरुंकडे केली होती. त्यानुसार राज्यपालांच्या आदेशाने तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. चौकशी समितीने आपला अहवाल सादर करून महिना उलटला आहे. मात्र अद्यापही कारवाई केली जात नाही. दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले.