- संदीप शिंदेलातूर : दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, दिवाळी होऊन २५ दिवस उलटले तरी लातूर व औसा तालुक्यांतील १६४५ प्राथमिक शिक्षकांचे वेतन अद्यापही झालेले नाही. त्यामुळे गृह, वाहनकर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा सवाल शिक्षकांमधून विचारला जात आहे.
जिल्ह्यात १२७८ जि.प. शाळा असून, जवळपास ५५०० शिक्षकांची संख्या आहे. शिक्षकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी वेतन जमा करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, दिवाळीआधी जि.प. माध्यमिक, खासगी शाळांतील शिक्षकांचे वेतन जमा झाले. मात्र, प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी निधी कमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आहे त्या निधीत आठ तालुक्यांचे वेतन नोव्हेंबरमध्ये करण्यात आले. परंतु, लातूर व औसा या दोन तालुक्यांतील शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवूनही अद्याप निधी मिळालेला नाही. त्यामुळे या दोन तालुक्यांतील शिक्षकांवर उसनवारीची वेळ आली असून, वेतन तातडीने जमा करण्याची मागणी होत आहे.
वेतनासाठी महिन्याला लागतात ४५ कोटी... जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी महिन्याला ४५ कोटी रुपये लागतात. मात्र, दिवाळी वेतनासाठी ६ कोटी ६८ लाखांचा निधी कमी आलेला होता. त्यामुळे लातूर व औसा दोन तालुके वगळून आठ तालुक्यांचे वेतन करण्यात आले.
सिबिल खराब झाल्यास जबाबदार कोण?शिक्षक गृह, वाहन कर्ज काढतात. त्यामुळे वेळेवर हप्ते भरावे लागतात. मात्र, वेतनाची १ तारीख असतानाही शिक्षकांचे वेतन कधीच वेळेवर होत नसल्याची ओरड आहे. परिणामी, सिबिल खराब झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल शिक्षकांमधून विचारला जात आहे.
शिक्षकांची दिवाळी उसनवारीवर...शासन व प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. दिवाळीपूर्वी वेतन न झाल्याने शिक्षकांची दिवाळी उसनवारीवर झाली. नोव्हेंबरची १७ तारीख असूनही अद्याप वेतन मिळालेले नाही. चौकशीच्या नावाखाली चालढकल करण्यापेक्षा निधी उपलब्ध करुन शिक्षकांचे वेतन अदा करावे. - केशव गंभीरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक काँग्रेस
वेतन निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव...दिवाळीपूर्वी वेतन जमा करण्याचे आदेश होते. मात्र, निधी कमी आल्याने आठ तालुक्यांतील शिक्षकांचे वेतन जमा करण्यात आलेले आहे. लातूर व औसा या दोन तालुक्यांतील शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, निधी मिळताच वेतन अदा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.